निकाल लागल्यापासून राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून भाजपचे देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री असणार अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात याची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर नाराज एकनाथ शिंदेंची समजूतही काढण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.






राज्यात महायुतीने सव्वादोनशेचा आकडा पार केल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू होती. गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा संधी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचं दिसून आलं. लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवल्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी शिवसेनेचे आमदार आक्रमक होते. तर दुसरीकडे एकट्या भाजपने 132 जागांवर विजय मिळवल्यामुळे देवेंद्र फडमवीसांना पुन्हा संधी मिळावी यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील होते.
दोन दिवसांच्या चर्चेनंतर आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न सुटला असून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दिल्लीतील नेत्यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री असतील अशीही माहिती आहे.











