विधानसभा निवडणुकीच्याविजयाचा गुलाल अजूनही उधळला जात असताना आता महायुतीने मोठा निर्णय घेतला आहे. सरकार स्थापन झाल्यावर 3 महिन्यात पुन्हा एकदा प्रचाराचा धुरळा उडणार आहे. राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.या प्रलंबित निवडणुका घेण्याबाबत महायुतीने निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.






नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि इतर घटक पक्षांचा समावेश असलेल्या महायुतीने घवघवीत यश मिळवले. राज्यातील 288 जागांपैकी 235 जागांवर महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत महायुतीत चर्चा होत असताना दुसरीकडे महायुतीने महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
निवडणुकीचा बिगुल वाजणार
राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूरसह इतर काही महत्त्वांच्या महापालिकांच्या निवडणुका मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. ओबीसी आरक्षण, वॉर्ड रचना अशा वेगवेगळ्या वादांमुळे महापालिकाच्या निवडणुका प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींच्या कचाट्यात अडकले आहेत. आता, यावर तोडगा काढून निवडणुका घेण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे.
कधी होणार महापालिका निवडणुका?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 3 महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीत याबाबत एकमत झाले आहे. विधानसभा निवडणूक निकालाचे वारे असेपर्यंत निवडणुका घेण्यावर महायुतीमध्ये एकमत झाले आहे. सरकार स्थापन होताच पहिल्या कॅबिनेट बैठकीत महापालिका निवडणूकांची अधिसूचना जारी केली जाणार आहे. त्यामुळे राज्यात 2 महिन्यांत पुन्हा एकदा निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार आहे. महापालिका निवडणुकांसोबत जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.










