विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळी सुरू असून महायुती व महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. त्यातच, आज महायुतीच्या घटक पक्षाचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. शरद पवारांच्या शारिरीक व्यंगावरुन त्यांनी टीका केल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार केला. आधी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सदाभाऊंना त्यांच्या वडिलांच्या वयाचा दाखला देत सुनावलं होतं. त्यानंतर, आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट व व्हिडिओच्या माध्यमातून सदाभाऊंवर हल्लाबोल केला. आता, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांनीही सदाभाऊ खोत यांच्या टीकेवर जोरदार पलटवार केला आहे.






ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी महायुतीतील घटक पक्षांचे नेते सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. आम्ही महायुतीचे घटक असलो तरी अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, अशा शब्दात अजित पवारांनी महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांना इशाराच दिला आहे. अजित पवार यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतरही शरद पवार हेच आमचं दैवत असल्याचं अजित पवार सातत्याने सांगतात. तसेच, शरद पवारांबद्दल कुठलेही विधान करण्याचं ते टाळताना दिसून येतात. मात्र, महायुतीमधील काही नेते, आमदार किंवा पदाधिकारी थेट शरद पवारांना लक्ष्य करतात. त्यामुळे, अजित पवारांसह त्यांच्या पक्षातील नेत्यांची चांगलीच अडचण होते.











