वर्षभरापासून तीव्र आंदोलन करुनही मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, असं म्हणत सरकारवर संतापलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी एक निर्णायक बैठक बोलावली आहे.या बैठकीसाठी राज्यभरातील इच्छूक उमेदवार हजर झाले आहेत.






महत्त्वाची बाब म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीला केवळ मराठा उमेदवारच नाही तर एससी, एसटी, मुस्लिम आणि इतर समाजाचे लोक हजर आले आहेत. आठवड्याभरापूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये जरांगे पाटलांनी ऐनवेळी सरकारची भंबेरी उडवणार असल्याचं म्हटलं होतं. त्याचं सूतोवाच आता त्यांनीच केलं आहे. अशा पद्धतीने सर्वच समाजाचे नेते जरांगेंनी मैदानात उतरवले तर भाजपचं नियोजन बघिडण्याची शक्यता आहे.
गुरुवारी बोलावलेल्या बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आज इच्छुक उमेदवारांची बैठक आहे.. मुलाखती नाहीत. ज्यावेळेस लढायचं की पाडायचं हे ठरले की त्यानंतर मुलाखती होतील. आज चर्चा करणे महत्त्वाचं होतं, माझ्या समाजासाठी ही बैठक महत्त्वाची आहे. २० तारखेला पुढची निर्णायक बैठक होणार आहे. आता कुणालाही शक्ती दाखवायची नाही. आपली शक्ती देशाने पाहिली आहे. आता समाज एकतर्फी आहे.
सर्वच पक्षांचे नेते भेटायला येत आहेत, त्याची कारणं काय आहेत? असा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले. यांना आता पाडापाडीची भीती वाटायला लागली का? यांचा मालक लैच तौऱ्यात होता. आमच्या डोळ्यादेखत दुसऱ्या जाती आरक्षणात घातल्या.. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे त्यांना भोगावं लागेल.
काय म्हणाले मनोज जरांगे?
मराठा समाजाने बोलावलेल्या बैठकीला इतके उमेदवार बघून माझे डोळेच फिरले आहेत. नारायणगडाची सभा झाल्यापासून बरेच उमेदवार वाढलेत. आता आम्ही चर्चा करणार आहोत. आमचा समाज एकमेकांच्या शब्दपुढे नाहीये.. मराठे काय गेम करतील याचा नेम नाही. गडाच्या सभेनंतर एससी, एसटी, मुस्लिम बांधव भेटायला येत आहेत. आजच्या बैठकीमध्ये अनेक मराठेत्तर लोक हजर आहेत.
”निवडणुकीबाबत २० तारखेनंतर पूर्ण चित्र स्पष्ट होईल. एसटी आरक्षणसाठी मराठा ताकदीने लढणार आहे, आमच्या विचाराचा माणूस मग तो कुठल्या विचाराचा किंवा कोणत्याही पक्षाचा असू द्या, आम्ही त्याला मदत करणार आहोत.” असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी सत्तापक्षाची डोकेदुखी वाढवली आहे.










