भाजपाला उमेदवार यादी जाहीर होण्याआधी मोठा धक्का! पक्ष सोडण्याची तयारीही? एकाही वचनाची पूर्तता नाही

0
26

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधी नाराजीनाट्य रंगत असल्याचं दिसत आहे. गणेश नाईक भाजपा सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. बेलापूर, ऐरोली मतदारसंघावर गणेश नाईकांचा दावा असून, जर या दोन्ही ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही तर ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं समजत आहे. यानंतर गणेश नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संदीप नाईक हे दोन टर्मचे आमदार आहेत, विकासात्मक चेहरा आहेत. अभ्यासू आहेत. त्यांनी केलेला जनसामान्यांमधील संवाद आणि पक्षातील योगदान पाहता नक्कीच भाजपाने त्यांना उमेदवारी दिली पाहिजे असं भाजपा पदाधिकारी रवींद्र इथापे म्हणाले आहेत. संदीप नाईक यांना डावलण्यात येत आहे असं वातावरण दिसत आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना त्यांना कोणत्याही माध्यमातून बेलापूरची उमेदवारी घ्यायला लावायची आणि निवडून आणायचं हा चंग बांधला आहे असं भाजपा पदाधिकारी सूरज पाटील यांनी सांगितलं.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

नवी मुंबईमधील राजकारणात गणेश नाईक यांची आतापर्यत एकहाती सत्ता आहे. ही सत्ता राखण्यासाठी त्यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीला रामराम करून भाजपात प्रवेश केला. पण भाजपाकडून दिलेल्या एकाही वचनाची पूर्तता न झाल्याने गणेश नाईक यांनी पुन्हा आपल्या स्वगृही परतावे असा सूर नुकत्याच पार पडलेल्या पदाधिकारी, नगरसेवकांच्या बेठकीत निघाला.

लोकसभेला ठाण्यातून संजीव नाईक यांना उमेदवारी देण्याची मागणी झाली. परंतु तिथेदेखील भाजपाकडून निराशा पदरात पडली. यामुळे विधानसभेला नवी मुंबईमधील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघ या दोन्ही जागा मिळाव्यात यासाठी गणेश नाईक आग्रही आहेत. यात ऐरोली मधून गणेश नाईक आणि बेलापूरमधून माजी आमदार संदीप नाईक यांना तिकिट देण्याची मागणी आहे. दोन तिकिट न दिल्यास मात्र दुसरा पक्ष किंवा अपक्ष लढण्याची तयारी संदीप नाईक यांनी केली आहे,

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

नवी मुंबईमधील दोन्ही जागा मिळाव्यात यासाठी नाईक पिता – पुत्र यांनी शरद पवार राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे मागणी केल्याचं समजत आहे. यामुळे नाईक पिता पुत्र पुन्हा स्वगृही परततात, की अपक्ष निवडणूक लढावी लागेल हे येत्या चार दिवसात समोर येईल. त्याचप्रमाणे बेलापूर मतदार संघातून शिंदे शिवसेना गटाचे उपनेते जय नाहटा निवडणूक लढवणार आहेत. यासाठी त्यांनी राजीनामा देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. पण अजून त्याचा प्रवेश रखडल्याने , नाईक स्वगृही परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.