राज्यामध्ये सध्या जोरदार पावसाचे आगमन झालेलं आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागाने (IMD) कोकणासह राज्यातील इतर भागाला देखील जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.त्यामध्ये कोकणासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये पुढील पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.






त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये हवामान विभागाकडून 20 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे, पालघर, ठाणे, मुंबई तसेच विदर्भातील सर्व जिल्हे यांना येलो अलर्ट असणार आहे. दरम्यान दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने हवामानामध्ये बदल झाला आहे. त्यामुळे या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. असं आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाने केलं आहे.
राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मागील पंधरा दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र या आठवड्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झाला आहे. मुंबईतील पावसानं सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे. तर, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या 14 दिवसांत पूर्ण करण्यात आली आहे. जुलै मध्यपर्यंतच पावसानं जुलै महिन्याच्या सरासरी एवढ्या पावसाचा टप्पा पार केला आहे.
 
            










