राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार धक्का बसला आहे. चिंचवड अन् भोसरी मतदासंघांतील 4 पदाधिकाऱ्यांसह एकूण 28 जणांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये विद्यमान शहराध्यक्षासह माजी आमदार, माजी नगरसेवक यांचा समावेश आहे. बुधवारी मोदीबागेत शरद पवार यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेतील तीन विधानसभा मतदान संघ पैकी दोन मतदारसंघांमध्ये इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपल्या गटासह शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यामुळे राखीव मतदार संघ उद्धव बाळासाहेब ठाकरे (उपनेते सुषमा अंधारे) यांच्यासाठी सोडण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.






गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पिंपरी-चिंचवड मधील माजी आमदार, नगरसेवक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठींबा देत त्यांच्यामागे ठामपणे उभे राहिले होते. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या शरद पवार यांच्या शरदचंद्र पवार पक्षाला मोठे यश मिळाल्याने त्यांच्याकडे जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
त्यातच बुधवारी पिंपरी चिंचवडमधील माजी आमदार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह महापालिकेतील माजी नगरसेवक असलेल्या 28 जणांनी शरद पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेत त्यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशामुळे अजित पवार गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडले आहे. मंगळवारी सर्व पदाधिकारी आणि नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे खासदार सुनील तटकरे यांना दिले होते. बुधवारी सकाळी मोदीबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी तुतारी हातात घेत आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचा संकल्प सोडला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात झालेल्या या पक्ष प्रवेशांमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गटाची ताकद वाढली असून याचा मोठा फायदा निवडणुकीत होणार असल्याचे बोलले जात आहे.
यांनी केला शरद पवार गटात प्रवेश
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये, माजी महापौर हनुमंत भोसले अजित गव्हाणे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी यांचा समावेश आहे.
• माजी महापौर वैशाली घोडेकर • माजी नगरसेवक पंकज भालेकर
• माजी नगरसेवक प्रवीण भालेकर • माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे
• दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे पती रवी सोनवणे
• दिवंगत नगरसेवक दत्ता काका साने यांचे पुत्र यश साने
• माजी नगरसेवक संजय नेवाळे
• माजी नगरसेवक वसंत बोराटे
• माजी नगरसेवक विजया तापकीर
• शहर जिल्हा कार्याध्यक्ष, पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले
• माजी नगरसेवक समीर मासुळकर
• माजी नगरसेवक गीता मंचरकर
• माजी नगरसेवक संजय वाबळे
• माजी नगरसेविका वैशाली उबाळे
• शुभांगी बोराडे
• विनया तापकीर
• माजी नगरसेविका अनुराधा गोफने
• माजी नगरसेवक घनश्याम खेडेकर
• युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे
• शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती मामा शिंदे
• माजी नगरसेवक तानाजी खाडे
• माजी नगरसेवक शशिकीरण गवळी
• विशाल आहेर
• युवराज पवार कामगार आघाडी
• विशाल आहेर, सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा
• नंदूतात्या शिंदे
• शरद भालेकर











