IAS पूजा खेडकरांचं कुटुंब फरार? पुणे पोलिसांकडून शोध सुरु, गुन्हे शाखेच्या तीन पथकांकडून सर्च ऑपरेशन

0
3

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं कुटुंब फरार झालं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्यानंतर पौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यासह त्यांचे पती आणि बाऊन्सर्स यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना हजर राहण्यास सांगितलं होतं. पण पुणे पोलीस प्रयत्न करुनही कुटुंबाशी संपर्क होत नाही आहे. यानंतर ते सर्वजण फरार झाले आहेत का? अशी शंका उपस्थित होत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी कुटुंबातील सात जणांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केली आहेत.

पौड पोलिसांच्या मदतीने खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जातोय. या सर्वांचे मोबाईल फोनही स्वीच ऑफ असल्याचं पोलीसांचं म्हणणं आहे. पुणे पोलिसांनी रविवारी खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील बाणेर भागातील बंगल्यात जाऊन तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र बंगल्याचं गेट बंद असल्याचं आढळून आल्यानंतर पोलिसांनी या बंगल्याचं चित्रीकरण केलं.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

दरम्यान पूजा खेडकर यांचा अकोल्यातील प्रशिक्षण कालावधी पुढे ढकलण्यात आला आहे. पूजा खेडकर या अकोल्यातील आदिवासी विकास प्रकल्प येथे प्रशिक्षणार्थी म्हणून 15 ते 19 जुलै पर्यंत रुजू होणार होत्या. दरम्यान वाशिममध्ये त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी केवळ समितीसमोरच उत्तर देणार असल्याचं सांगितलं आहे. “मी यावर काहीं बोलणार नाही. मला नियमावर बोलायचं नाही. मी माध्यमांपुढे काहीबी बोलणार नाही. मी जे काही बोलणार ते समितीपुढे बोलणार,” असं त्या म्हणाल्या आहेत.

तसंच आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी पीएमओ कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे…पूजा खेडकरांचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यता आहे. यासोबतच पूजा खेडकरांना दिव्यांग प्रमाणपत्र देणा-या डॉक्टरांचीही चौकशी होणार आहे. .

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

तसंच पूजा खेडकरांनी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठीही नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट सादर केलं होतं अशी माहिती समोर आली आहे. पूजा खेडकरांनी 2007 मध्ये पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश घेतला होता. यावेळी NT – 3 म्हणजेच भटक्या जमातींसाठी आरक्षित असलेल्या कोट्यातून प्रवेश घेतला होता. कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 8 लाखांच्या आत असेल तरच नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट देण्यात येतं. आता आयएएसनंतर मेडिकल प्रवेशासाठी देखील नॉन क्रिमीलेअरचा वापर केला हे स्पष्ट होतंय. आई डॉक्टर आणि वडील शासकीय नोकरीत वरिष्ठ पदावर असताना तिला नॉन क्रिमीलेअर कसे मिळाले हा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान मेडिकल प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्याला फिटनेस सर्टिफिकेट देखील सादर करावं लागतं. काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पूजा खेडकरांनी फिटनेस सर्टिफिकेट सादर केलं होतं. त्यामध्ये त्यांनी कुठल्याच स्वरूपात दिव्यांग नसल्याची नोंद आहे. त्यामुळे कॉलेज प्रवेशाच्या वेळी मात्र त्या पूर्णपणे तंदुरुस्त होत्या अशी माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती