पुण्यातून एक काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. शहरात झिकाचे सात रुग्ण आतापर्यंत आढळून आलेत. या विषाणूचा सर्वाधिक धोका गर्भवती महिलांना असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर झिकाचा सर्वाधिक धोका गर्भवतींना असल्याने महापालिकेने त्यांच्या तपासणीवर भर दिला आहे.






कोणत्या परिसरात आढळले झिकाचे रूग्ण?
एरंडवणे, मुंढवा आणि डहाणूकर कॉलनी परिसरात झिकाचे रुग्ण आढळून आलेत. या परिसरातील ४१ गर्भवतींचे रक्त नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहे. एरंडवणे परिसरात एकूण ७२ गर्भवती आहेत. त्यातील १४ गर्भवतींचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविण्यात आले आहेत. याचबरोबर मुंढवा परिसरातील ६० पैकी १८ गर्भवतींचे नमुने आणि डहाणूकर कॉलनी परिसरातील ३५१ पैकी ९ गर्भवतींचे नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाने एनआयव्हीकडे पाठविले आहेत.
आरोग्य विभागाकडून शहरात सर्वेक्षण
आरोग्य विभागाने गर्भवतींसह एकूण ६४ जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीला पाठवविले आहेत. त्यातील सुमारे २५ जणांचे तपासणी अहवाल आरोग्य विभागाला मिळाले आहेत. त्यामुळे अद्याप सुमारे ४० जणांचे तपासणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आरोग्य विभागाकडून शहरात सर्वेक्षण सुरू आहे. यात २४६ घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या. या प्रकरणी ८२ जणांना नोटीस बजावून, त्यांच्याकडून देऊन ६६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
झिकाच्या पार्श्वभूमीवर नागपूर देखील अलर्ट मोडवर
नागपूर देखील झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर अलर्ट मोडवर आल्याचं दिसत आहे. आरोग्य विभागातर्फे झिका विषाणू संसर्गाची मार्गदर्शक नियमावली जाहीर करण्यात आलीय. गर्भवती महिलांना झिका विषाणू संसर्गाच्या दृष्टीने तपासणी करून सतत दक्ष राहण्याचे निर्देश दिलेत. झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या गर्भवती महिलांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्यात. विदर्भात सध्यातरी झिकाचा एकही रुग्ण नाही. परंतु, खबरदारी म्हणून मार्गदर्शक नियमावली जाहीर करण्यात आलीय.











