पुणे : नवनिर्वाचित खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी हडपसर विधानसभा मतदार संघात वानवडी व हडपसर येथे जनता दरबार भरवले, जनता दरबारास उस्फुर्त प्रतिसाद लाभला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निवेदन देऊन समस्या मांडल्या, खासदार डॉ.कोल्हे यांनी तात्काळ अधिकारी व संबंधित प्रशासनाशी चर्चा करून जागेवरच समस्या सोडविल्या तर काही प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनास आदेश दिले.
वानवडी क्षेत्रीय कार्यालय येथे सकाळी दहा ते बारा या वेळेत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता, त्यानंतर बारा ते तीन या वेळेत हडपसर मधील कन्यादान मंगल कार्यालयात जनता दरबार होता, हडपसर विधानसभा मतदारसंघातील मोठ्या प्रमाणावर नागरिक व महिला या जनता दरबारात सहभागी झाले होते, निवेदने व आपल्या समस्या त्यांनी खासदारांसमोर मांडल्या काही महिलांना समस्या मांडताना अश्रू अनावर झाले खासदार डॉ.कोल्हे यांनी सर्व नागरिकांचे प्रश्न बारकाईने ऐकून घेतले उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन समस्या सोडविण्यास सांगितले तसेच महापालिका व प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून काही नागरिकांच्या समस्या मांडून तातडीने समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या समवेत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी उपमहापौर निलेश मगर, बंडू तात्या गायकवाड, माजी नगरसेवक योगेश ससाणे, अविनाश काळे, उर्मिला नितीन आरु, शीतल संजय शिंदे, पल्लवी प्रशांत सुरसे, महापालिकेचे सहायक आयुक्त ढवळे पाटील, व प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
निवडून आल्यानंतर महिन्यातच खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी कामाचा झपाटा सुरू केला आहे, वर्षानुवर्षाचे प्रश्न प्रलंबित आहेत राजकीय नेत्यांनी केवळ सत्ता भोगली परंतु लोकांचे प्रश्न सोडवले नाहीत, जनता दरबार च्या माध्यमातून जागेवरच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न खासदारांच्या माध्यमातून झाला आहे, मतदार संघात सर्व प्रभागात अशा पद्धतीने जनता दरबार घेणार आहोत. अशी माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
हडपसर विधानसभा मतदारसंघात अतिक्रमण, रस्ते, जलवाहिनी, ड्रेनेज व पिण्याच्या पाण्यामध्ये अनियमितता खूप मोठी समस्या आहे या सर्व समस्या ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सूचना दिल्या आहेत, हडपसर विधानसभा मतदारसंघात विभागवार जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले जातील. असे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.