“उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणाची सुरुवात जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या ओवीने केली. अजितदादांच्या मुखात तुकोबा आले म्हणजे लोकसभेचा परिणाम झालेला दिसतोय. असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. तुकाराम महाराज मवाळ होते, पण दांभिकपणावर त्यांनी कठोर प्रहार केले. त्यामुळे माझ्याही भाषणाची सुरुवात तुकाराम महाराजांच्या ओळीने करतो. तुकाराम महाराज म्हणतात घासावा शब्द तासावा शब्द, फुलावा शब्द बोलण्यापू्र्वी. बोलावे मोजके खमंग आणि खमके”, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. ते विधानसभेत बोलत होते. यावेळी जयंत पाटलांनी अजित पवार यांना शाब्दिक टोले लगावले.






शिवराजसिंह चव्हाणांना परत मुख्यमंत्री होता आलं नाही
जयंत पाटील म्हणाले, शिवराजसिंह चव्हाण यांनी लाडकी बहिण ही योजना राबवली. त्या राज्यात म्हणजे मध्यप्रदेशमध्ये ही योजना लोकप्रिय झाली. मात्र, शिवराजसिंह चव्हाणांना परत मुख्यमंत्री होता आलं नाही. एकनाथ शिंदेंना हे माहिती आहे की नाही? हे मला माहिती नाही. या योजनेमुळे त्यांच्यावर काय संकट आहे, हे त्यांच्या लक्षात आलेले नाही. त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी ही योजना अजित पवारांना मांडण्यास सांगितले.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, एक उज्ज्वला नावाची योजना केंद्र सरकारने वाजत गाजत आणली होती. बॅनर लावले होते, गॅसचे कनेक्शन सर्वांना दिले. सर्व देशभर महिलांचे फोटो लावण्यात आले. उज्ज्वला योजनेमुळे आम्हाला फायदा झाला, असे दावे करण्यात आले, पण पुढे काय झाले आपणा सर्वांना माहिती आहे,असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.
जयंत पाटलांचा एकनाथ शिदेंवरही पलटवार
जयंत पाटील यांच्यापूर्वी विधानसभेत एकनाथ शिंदे यांनीही जोरदार फटकेबाजी केली. महाविकास आघाडीतील स्पर्धेत जयंतराव सर्वांत पुढे आहेत. त्यामुळेच नाना पटोले फिल्डवर उतरले आहेत, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला होता. शिवाय, जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या, असंही शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर जयंत पाटलांनी शिंदेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. लाडकी बहिण योजना राबणारे शिवराजसिंह चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री झाले नसल्याचे जयंत पाटील म्हणाले.












