पुण्यातील 8 मतदारसंघात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष दावे करताना दिसत आहेत. मात्र पुण्यातील मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती आहे. वरिष्ठ पातळीवर या जागांबाबत चर्चा झालेली आहे. पुणे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाची वाढलेली ताकद लक्षात घेता महाविकास आघाडीच्या वतीने पुणे हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला सर करण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले असून त्यानुसार आखणी करण्यात आली आहे.






2019 मध्ये मुख्य शहरी भागामध्ये पुणे कॅन्टोन्मेंट कसबा आणि शिवाजीनगर या पट्ट्यामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद वाढली असून यामध्ये काँग्रेसला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांमध्ये शिवाजीनगर दत्ता बहिरट कसबा विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर आणि पुणे कॅन्टोन्मेंट माजी गृहमंत्री रमेश बागवे यांच्या नावांची चर्चा आहे. काँग्रेस (मुख्य शहर) आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला (समाविष्ट भाग) प्रत्येकी 3 तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला (भारतीय जनता पक्षाचे बालेकिल्ले) 2 जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. प्राथमिक चर्चेनुसार शहरातील कसबा, पुणे कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगर या तीनही जागा काँग्रेसकडे असतील. खडकवासला, पर्वती, हडपसर या जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे असतील तर कोथरूड व वडगावशेरी मतदारसंघशिवसेना ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन वेळा वडगाव शेरी मतदारसंघ विजयी पताका फडकवलेला असतानाही शिवसेनेसाठी हा मतदारसंघ सोडण्यामागे सूक्ष्म नियोजन असून हा विधानसभा मतदारसंघ शिवसेना जिंकण्यासाठी कोणते डावपेच असते याकडे सर्व पुणे शहराचे लक्ष लागले आहे. लोकसभेनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सर्व पक्षीयांकडून सुरु झालेली दिसत आहे. यामध्ये लोकसभेप्रमाणेच महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचे ठरवले आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे. मात्र महाविकास आघाडीत छोटा भाऊ, मोठा भाऊ अशीही काही वक्तव्येही समोर येत आहेत.
लोकसभेला अधिक जागा हव्या होत्या मात्र मविआ ऐक्यासाठी दोन पावले मागे आलो असे वक्तव्य शरद पवारांनी केले होते. स्थानिक पातळीवर जागांचा वाद असला तरी पक्षाच्या नेत्यांकडून जागा निश्चित आहेत. पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातून काढून घ्यायचे असेल तर काही जागांचा अदलाबदल नवीन चेहरे हे आवश्यक असल्याची जाणीव महाविकास आघाडीतील पक्ष नेत्यांना असल्यानेच शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षांकडून विविध स्तरावरती चाचणी केली जात असेल जुन्याचे रंगनाथ संधी द्यायचे की नवीन चेहऱ्यांना ‘नशीब’ आजमावायला मिळेल अशी नवी चर्चा सुरू झाली आहे. काम सुरु करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहितीही मिळत आहे.











