2024 ची लोकसभा निवडणुक नुकतीच पार पडली आहे. एनडीएने बहुमताच्या जोरावर सरकार स्थापन केले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. ‘इंडिया’ आघाडीला विरोधात बसावे लागले आहे. अशातच राहुल गांधी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत एनडीए आघाडीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. एनडीएचे लोक आमच्या संपर्कात असल्याचं राहुल गांधी यांनी म्हंटलं आहे.
मोदी सरकारला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागणार
दरम्यान, राहुल गांधी यांनी नुकतीच फायनान्शियल टाइम्सला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले की,”अनपेक्षित निवडणुकीच्या निकालानंतर भारतातील राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या सरकारला आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल, तसेच भाजपच्या खासदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे एक छोटीशी गडबड सरकारला अडचणीत आणू शकते.”
एनडीएमधील काही लोक आमच्या संपर्कात
राहुल गांधी पुढे म्हणाले की,” आत्ता स्थापन झालेल्या मोदी सरकारमध्ये मोठ्याप्रमाणात ‘असंतोष’ आहे. त्यामुळे एनडीएतील काही लोक आमच्या संपर्कात आहेत, लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी धार्मिक तणावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भारतातील मोठ्या मुस्लिम अल्पसंख्याकांना ‘घुसखोर’ म्हटले आहे.”