जिल्ह्यात असूनही महायुतीच्या महत्वाच्या बैठकीला भुजबळांची दांडी, चर्चांना उधाण

0

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज महायुतीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री दादा भुसे, भाजप आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली आहे. महायुतीचे घटक पक्षाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. मात्र या बैठकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी पाठ फिरवली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. किशोर दराडे यांच्यासाठी ही बैठक पार पडत आहे. बैठकीत निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भावसार यांच्या संदर्भात या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भुजबळांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

अजित पवार गटाच्या भूमिकेबाबत संभ्रम

मंत्री छगन भुजबळ हे सकाळी 10 वाजता नाशिकहून येवला मतदारसंघाकडे रवाना झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात असूनही छगन भुजबळ बैठकीला अनुपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे या बैठकीला उपस्थित आहेत. अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एबी फॉर्म दिला होता. महायुतीने उमेदवार दिलेला असतानाही अजित पवार गटाने निवडणुकीसाठी उमेदवार दिल्याने अजित पवार गटाच्या भूमिकेबाबत महायुतीत संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे.

महाविकास आघाडीतील तिढा सुटला

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत देखील फाटाफूट झाल्याचे दिसून आले होते. शिवसेना ठाकरे गटाने मविप्रचे संचालक संदीप गुळवे यांना उमेदवारी जाहीर केली होती. तर काँग्रेसकडून दिलीप पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी माघार घेतली. त्यामुळे संदीप गुळवे यांचा निवडणुकीसाठी मार्ग मोकळा झाला आणि महाविकास आघाडीतील तिढा सुटला होता.