पुणे, राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड अन् जिल्ह्याच्या नावावर एका वेगळ्या विक्रमाची नोंद झाली. दोन-तीन जिल्हे मिळून असणाऱ्या खासदारांची एकट्या पुणे जिल्ह्यात संख्या झाली. तेथे खासदारांची संख्या 8 झाली आहे. पुणे जिल्ह्यात लोकसभेचे चार खासदार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीने राज्यसभा खासदारांचीही संख्याही तेवढीच झाली. यापूर्वी तेथे शरद पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्या वंदना चव्हाण खासदार आहेत.






तर, नुकत्याच भाजपच्या मेधा कुलकर्णी राज्यसभा सदस्य झाल्या आहेत. त्यानंतर आता, सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून आल्याने राज्यसभेत एकट्या पुणे जिल्ह्याचा खासदारकीचा चौकार मारला आहे. पुणे जिल्ह्यात पुणे शहर, मावळ, शिरुर आणि बारामती असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात महायुती आणि आघाडीची फिफ्टी- फिफ्टी झाली, त्यांचे दोन-दोन खासदार विजयी झाले.
बारामतीत आघाडीकडून (शरद पवार राष्ट्रवादी) शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे यांनी हॅटट्रिक केली. तशीच मावळमध्ये महायुतीचे (शिंद शिवसेना) श्रीरंग बारणे यांनी ती नोंदवली. पुण्यातून महायुतीचेच (भाजप) मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच लोकसभेला निवडून आले. ते नगरसेवकाचे थेट खासदार झाले.
यापूर्वी ते पुण्यात नगरसेवक (महापौर) होते. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. नागरी उड्डाण आणि सहकार खात्याचे राज्यमंत्रीपद त्यांना देण्यात आले. तर, शिरुरमधून शरद पवारांचे खंदे समर्थक डॉ. अमोल कोल्हे पुन्हा निवडून आले. सेलिब्रिटी आणि ओघवते वक्तृत्व या जोरावर ते पुन्हा खासदार झाले.
राज्यात कुठल्याही जिल्ह्यात आठ खासदार नाहीत. तो रेकॉर्ड पुणे जिल्ह्याने केला आहे. एवढेच नाही, तर या खासदारांपैकी एक मंत्रीही आहेत. हे विशेष, तसेच त्यात शरद पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे अशा अनुभवी आणि दिग्गज खासदारांचा समावेश आहे.
कोल्हेंनी, तर पहिल्याच टर्ममध्ये आपल्या भाषणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतूकही मिळवले. तेच, सुळे आणि बारणे हे संसदेतील कामगिरीच्या जोरावर एकदा नाही, तर अनेकदा संसदरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले. सुळे आणि बारणेनी तर महासंसदरत्न किताबही मिळवला आहे.











