बॉलिवूडची ‘पंगाक्वीन’ अर्थात कंगना रनौत हिने भाजपकडून (BJP) हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मंडीमध्ये एकीकडे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत होती. तर दुसरीकडे तिच्या विरोधात माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि सध्याच्या खासदार प्रतिभा सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. 1 जून 2024 रोजी ही निवडणूक पार पडली.






हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये नेहमीच काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. आता या दोन्ही पक्षांतील दोन तरुण चेहरे यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरले. कंगना रनौत गेल्या एका दशकापासून बॉलिवूडमध्ये हिंदुत्वाचा प्रचार करताना दिसून आली. त्यामुळे ‘पंगाक्वीन’ अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली. तर दुसरीकडे विक्रमादित्य सिंह हाडाचा राजकारणी आहे. तर दुसरीकडे विक्रमादित्य सिंह यांचे आई-वडील दोघेही हिमाचल प्रदेशातील राजकारणात सक्रीय आहेत.
मंडी लोकसभा निवडणुकीचा इतिहास काय?
मंडी लोकसभा निवडणुकीत राजघराण्यांचा अनेकदा दबदबा दिसून आला आहे. आतापर्यंत 19 वेळा झालेल्या निवडणुकीत 13 वेळा राजघराण्यांतील नेते संसदेत पोहोचले आहेत. तर फक्त सहा वेळा सर्वसामान्य कुटुंबातील नेत्यांनी बाजी मारली आहे. 1952 मध्ये झालेल्या निवडणुकीत देशातील पहिल्या आरोग्य मंत्री अमृतकौर होत्या. अमृतकौर या पटियाला घराण्यातील आहेत.
कंगना रनौतने प्रचार कसा केला?
हिमाचल प्रदेशातील मंडी एका दशकाआधी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. पण गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत मंडीमधील लोकांनी भारतीय जनला पक्षाला समर्थन दिलं आहे. त्यामुळेच 2017 साली सत्ताबदल झाल्यानंतर मंडी जिल्ह्यातील सराज विधानसभेशी संबंध असणारे जयराम ठाकूर यांना भाजप हायकमांडने मुख्यमंत्री पद सोपवले होते. मंडी जिल्ह्यातील 10 पैकी 9 जागांवर भाजपाचा बोलबाला आहे. मंडीकडून संसदेत यंदा भाजपचे जयराम ठाकूर आहेत. त्यामुळे मंडीमध्ये कंगनाचा प्रचार करण्याची धुरा जयराम यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. 24 मे 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंडीतील पड्डल मैदानात एका महारॅलीचं आयोजन केलं होतं. मोदींच्या या महारॅलीला मंडीतील मंडळींचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. कंगनाच्या प्रचार रॅलीला लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. भाजपाच्या प्रचार फेरीतही कंगनाचा हा अंदाज पाहायला मिळाला. मंडयाल बोलीच्या माध्यमातून कंगनाने मंडीतील लोकांची मने जिंकली. पण काही वादग्रस्त वक्तव्यामुळे मात्र तिने काहींना नाराज केलं आहे.
कंगना रनौत आपला प्रचारादरम्यान काँग्रेसवर निशाणा साधला होता. दरम्यान ‘पंगाक्वीन’ने आपल्या विरोधात असलेल्या विक्रमादित्य सिंह यांच्याबद्दल काही वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे अभिनेत्री अडचणीतदेखील आली. कंगना आणि विक्रमादित्य यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे शेवटपर्यंत सुरू होते. कंगना बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असल्याने प्रचारादरम्यान तिला चांगलाच फायदा झाला.
मंडी लोकसभा मतदार संघात मंडी, कुल्लू, लाहौल स्पीती, किन्नौर, शिमला आणि चंबा जिल्ह्यातील 17 विधानसभा मतदार संघ येतात. कंगनाने आपल्या प्रचार फेरीत आरोग्य, शिक्षण, महिला सुरक्षा अशा विविध मुद्द्यांना हात घातला होता. निवडणूक जिंकले जर बॉलिवूड सोडेल, असं करिअरसंदर्भात मोठं वक्तव्य कंगनाने प्रचारादरम्यान केलं.











