देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तन होत आहे. प्रत्यक्ष भगवान, ईश्वराचे अवतार , काशीपुत्र असे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघात पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते. यावरून चित्र स्पष्ट दिसतंय. हा फक्त उत्तर प्रदेशचा नव्हे तर देशाचा कल आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली. या निवडणुकीत काँग्रेसला १५० ला जागा मिळतील. ज्या पक्षाला गेल्या निवडणुकीत ५० जागाही मिळाल्या नव्हत्या, तो १५० च्या पुढे जाऊ शकतो असं चित्र दिसत आहे. काँग्रेसने १५० पर्यंत जाणं म्हणजे नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला असं समजा, असे म्हणत शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले.
लोकसभा निवडणुकांचे मतदान झाल्यानंतर आज सकाळपासून मतमोजणी सुरू असून सुरूवातीचे कल समोर येत आहेत. भाजपची पुन्हा एकहाती सत्ता येईल असे भाकीत अनेन एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आले होते. मात्र आजच्या कलांनुसार वेगळंच चित्र दिसत आहे. देशाता एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात टक्कर होताना दिसत्ये. आत्तापर्यंतच्या आकड्यांनुसार भाजपा प्रणीत एनडीएकडे २८९ जागांवर आघाडी आहे तर काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने २३४ जागांचा टप्पा ओलांडला आहे. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली.
काय म्हणाले संजय राऊत ?
– देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तन होत आहे. सध्या फक्त कल सुरू आहेत.देशाचे पंतप्रधान मोदी वाराणसीत पहिल्या तीन फेरीत पिछाडीवर होते. हाच कल आहे. जो निकाल लागायचा आहे तो लागेल. पण प्रत्यक्ष भगवान, ईश्वराचे अवतार , काशीपुत्र नरेंद्र मोदी हे वाराणसीत तीन फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते. हा उत्तर प्रदेशचा नव्हे देशाचा कल आहे. दुपारी २ पर्यंत चित्र स्पष्ट होईल.
– एक्झिट पोलचे समोर आलेले आकडे पार करून इंडिया आघाडी झपाट्याने पुढे जात आहे. काँग्रेसचं 150 जागांपर्यंत पोहोचणं म्हणजे मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला असं मी समजतो. जो आमचा अभ्यास आहे, त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे राहील आणि देशभरात इंडिया आघाडी २९५ पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
– एनडीएला बहुमताचा आकडा गाठता येईल असं दिसत नाही, असं दिसतंय. पण त्यावर चर्चा करण्यासाठी वेल आहे, संपूर्ण निकाल आल्यावर बोलू.
– एक्झिट पोल, ओपिनियन पोल, मिडीया यांचा वापर करून भाजपने गोबेल्स नितीने प्रपोगंडा चालवला होता. तो किती चुकीचा, भंपक होता हे आजा संध्याकाळी दिसेल अशी टीका राऊत यांनी केली.