देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आता इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ थेट देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. इंडिया आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजांवर संशय आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ थेट आता राष्ट्रपतींशी या विषयावर चर्चा करणार आहे. इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. मतदानाच्या वाढत्या टक्केवारीच्या आरोपांवरुन शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यातील मतदान झालं आहे. त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मतदानाच्या टक्केवारीत तफावत कशी? यावरुन विरोधक निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून या संदर्भात स्पष्टीकरणाची मागणी केलीय. लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा पहिला टप्पा हा 19 एप्रिलला पार पडला. या दिवशी देशामध्ये संध्याकाळपर्यंत सरासरी 60 टक्के मतदान झालं. यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिलला मतदान पार पडलं. या दिवशी सरासरी 61 टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात आली.
दोन्ही टप्पे मिळून 60 टक्के सरासरी मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाने कळवलं. मात्र 11 दिवसांनी म्हणजेच 30 एप्रिलला 66 टक्के मतदान झाल्याची सुधारित आकडेवारी निवडणूक आयोगाने दिली. याचाच अर्थ आधी आणि नंतर दिलेल्या आकडेवारीत 6 टक्क्यांचा फरक आहे. याआधीपर्यंत मतदानाच्या दुसऱ्या दिवशी जी आकडेवारी मिळायची तीच अंतिम मानली जायची. पण यंदा 11 दिवसांनी सुधारित आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे हा विलंब का लागला? याचं उत्तर विरोधक निवडणूक आयोगाकडे मागत आहेत.
विरोधकांचा नेमका आरोप काय?
विरोधकांचा आरोप आहे की, निवडणूक आयोगाने केवळ किती टक्के मतदान झालं याची आकडेवारी यावेळी दिली. प्रत्यक्षात कोणत्या मतदारसंघात किती मतदान झालं ते जाहीर केलं नाही. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले. पहिल्या टप्प्यातील मतदानाचे आकडे 11 दिवसांनंतर का आले? दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचे आकडे 4 दिवसानंतर येण्याचा अर्थ काय? मतदानाच्या 24 तासांच्या आत आकडेवारी का आली नाही? अंदाजित आणि अंतिम आकडेवारीत इतका फरक कसा झाला? असे अनेक प्रश्न जयराम रमेश यांनी उपस्थित केले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत रांगा होत्या. वेळ संपल्यानंतर कायद्याप्रमाणे रांगेतील मतदान पूर्ण करावं लागतं. याशिवाय आदिवासी भागात उशिरापर्यंत मतदान चाललं. तर काही भागांमध्ये ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आकडेवारी उशिरा मिळाल्याचं अधिकारी सांगत आहेत. मात्र, निवडणूक आयोगाकडून अधिकृत स्पष्टीकरणाची मागणी विरोधकांनी केली आहे. अंतिम आकडेवारीत 6 टक्क्यांचा फरक कसा? असा प्रश्न करत विरोधक निवडणूक आयोगाच्या कारभारावर सवाल करत आहेत.