पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बॅंकेने (शिखर बॅंक) थकीत कर्जाप्रकरणी जप्तीची कारवाई केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. मात्र, भाजपला पाठिंब्याचा निर्णय जाहीर करताना मी माझी स्वतःची राजकीय महत्वकांक्षा बाजूला ठेवून विठ्ठल कारखान्याच्या सभासदांच्या हिताचा निर्णय घेत आहे,’ असे म्हटले आहे, त्यामुळे पाटील यांनी हा निर्णय कोणत्या मानसिकतेत घेतला, हे दिसून येते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर बुधवारी विठ्ठल कारखान्याचे संचालक, सभासद आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक अभिजित पाटील यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. त्या वेळी त्यांना कारखान्यावर प्रशासक नेमण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले.
जे लोक काँग्रेसला पाठिंबा देतात आणि भाजपच्या नेत्यांना भेटतात. तेच लोक विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्याची अफवा पसरवत आहेत. मग तुम्ही नेमकं हाय कोणाचं? तिकडं तेलंगणाचे दार लावून आता इकडं चौथंच ते करीत आहेत. या पेक्षा माझी विनंती आहे की, कोणीही विठ्ठल कारखान्याच्या सभासदांच्या मुळावर उठू नये. शेतकऱ्यांची संस्था जगली पाहिजे, त्यासाठी मी माझी स्वतःची राजकीय महत्वकांक्षा बाजूला ठेवून सभासदांच्या हिताचा निर्णय घेत आहे, त्यात तुम्ही राजकारण करू नये. प्रशासक नेमण्यासारखी कुठलीही गोष्ट होणार नाही आणि तुमचा डाव साधू दिला जाणार नाही, असा इशाराही अभिजित पाटील यांनी विरोधकांना नाव न घेता दिला.
फडणवीसांनी शब्द देऊनही कारखान्यावर कारवाई झालेली आहे. त्याबाबत आज कारखान्यासंदर्भात सुनावणी होणार आहे. त्यात आम्हाला न्याय मिळेल. भाजप प्रवेशाबाबत कोणतीही तारीख दिलेली नाही. पण 3, 4, 5 यापैकी एक दिवस मेळावा घेऊन आम्हाला पाठिंबा जाहीर करा, असे भाजपच नेत्यांनी सांगितले होते. पण, उमेदवार पंढरपूर भागात आल्यामुळे आम्ही आमचा पाठिंबा जाहीर केला. भाजपकडून आम्हाला वेळ दिला, तर मोठा मेळावा घेऊन आम्ही प्रवेशाचा निर्णय घेऊ, असेही पाटील यांनी नमूद केले.
मी महायुतीमध्ये आल्यामुळे अगोदरच तेथे असलेल्या लोकांची काहीही अडचण होणार नाही. त्यांच्या कारखान्याचा आणि माझा काय विषय आहे. मी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सभासदांनी निवडून दिलेला चेअरमन आहे. मी माझ्या कारखान्यात परवडेल, तेवढा दर देणार. त्यांना परवडतो की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. तो माझा प्रश्नच नाही, असे सांगून विठ्ठल साखर कारखान्याला सर्वोतपरी मदत करण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.