मोदींना मत म्हणजे विनाशाला मत असं विरोधक, उद्धव ठाकरे म्हणत आहेत. आमचं जेव्हा सरकार येईल, ईडी, सीबीआय आमच्या ताब्यात असतील तेव्हा आम्ही यांच्यावर कारवाई करू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते. घरात बसलेले लोक, दुसऱ्याच्या घरात काय घुसणार ? आमचं सरकार येणार कुठंली स्वप्न पहात आहेत, कुठल्या मुर्खांच्या नंदनवनात आहेत ? असा खोचक सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला. घरात बसून पंतप्रधान होता येतं का ? परदेशात थंड हवा खाऊन प्रधानमंत्री बनता येतं का ? परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करून पंतप्रधान कसं बनता येईल ? आपल्याच देशाच्या पंतप्रधांनाची बदनामी दुसऱ्या देशात जाऊन करणारी व्यक्ती पंतप्रधान बनू शकतो का ? असा सवाल विचारत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.






ऊन, पाऊस, हिवाळा, थंडी कशाची पर्वा न करता 24*7 मोदीजी हे देशाच्या जनतेसाठी , विकासासाठी काम करत आहेत. पूर्ण आयुषय त्यांनी जनतेसाठी वाहून घेतलं, समर्पित केलं. आई गेल्याचं दु:ख बाजूला ठेवून ते तत्काळ देशसेवेला लागले. लोकं अशा व्यक्तीला पंतप्रधान करतील की घरबशा व्यक्तीला सत्ता देतील ? घरात बसून फेसबूक लाइव्ह करणाऱ्या व्यक्तीला कोण पंतप्रधान करेल? अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचाराला वेग आला आहे. त्याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी tv9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं दिली, तसेच उद्धव ठाकरेंवरही हल्ला चढवला.
आमचं सरकार फेस टू फेस काम करणारं आहे, फक्त फेसबूक लाइव्ह करणारं नव्हे
गेल्या ५०-६० वर्षांपासून देशात काँग्रेसची सत्ता तर गेली १० वर्ष भाजप सत्तेत आहे. इतक्या वर्षांत जे काँग्रेसला जमल नाही, ते गेल्या १० वर्षातील सत्तेत मोदीजींनी करून दाखवलं. गोरगरिबांसाठी काम केलं, त्यांच्या कल्याणासाठी ते दिवसरात्र झटत आहेत. असं आमचं सरकार आहे, फेस टू फेस काम करणार आमचं सरकार आहे, फक्त फेसबूक लाइव्ह करणारं, उंटावरून शेळ्या हाकणार सरकार नव्हे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मविआ सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. जे फक्त घरात बसतील त्यांच्या नव्हे तर काम करणाऱ्यांच्या मागे आम्ही उभं राहू असं जनतेने ठरवलं आहे, आम्ही विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढवत आहोत, असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील उद्योग गेले
भाजपमुळे महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेले, असा आरोप करण्यात येतो असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. आपलं राज्य हे इंडस्ट्री फ्रेंडली आहे, कुशल मनुष्यबळ आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे. जे उद्योग राज्यातून गेले ते मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. आमच्याकडे उद्योगपती येतात तेव्हा आम्ही त्यांना विचारतो, तुम्हा काय सुविधा पाहिजेत ? थेट विचारतो आणि अडचणी सांगा ते सोडवतो, असं त्यांना सांगतो. पण मागचं सरकार त्यांना विचारायचं की आम्हाला काय मिळेल ते आधी सांगा, आमचं काय ? असंही म्हणायचे. त्यांच्या नाकर्तेपणामुळे उद्योग राज्यातून बाहेर गेले.











