लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडी, महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपतींना कोल्हापूर शहरातील 17 माजी महापौर आणि 228 माजी नगरसेवकांनी पाठिंबा देत त्यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. देशातील हुकुमशाही कारभार परतावून लावण्याची लढाई कोल्हापूरातून सुरू झाली पाहिजे, असा एल्गारही माजी नगरसेवकांच्या बैठकीत करण्यात आला.






न्यू पॅलेस येथे झालेल्या माजी नगरसेवकांच्या मेळाव्याला काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगांवकर, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, मालोजीराजे छत्रपती, काँग्रेसचे प्रदेश निरीक्षक रामचंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकसभा निवडणूक प्रचाराला रंग चढू लागला असून सत्ताधारी आणि विरोधी आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने 17 माजी महापौर आणि 228 माजी नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत सत्ताधारी महायुती आघाडीवर चांगलीच कुरघोडी केली आहे.
माजी नगरसेवकांच्यावतीने बोलताना माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, केंद्रातील भाजप (BJP) सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. इलेक्ट्रॉन बाँडमध्ये मोठा महाघोटाळा झाला आहे. एकीकडे जनतेचे महागाईने कंबरडे मोडले असून उद्योजकांच्या संपत्तीत वाढ होत चालली आहे. जाती, धर्मात भांडणे लावली जात आहेत. अशावेळी देश वाचवण्यासाठी सर्वांनी सिध्द झाले पाहिजे. देशातील हुकुमशाही कारभार परतावून लावण्याची लढाई कोल्हापूरातून झाली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील म्हणाले, ज्यावेळी जिल्ह्यात शहरात आणि जिल्ह्यात संकट आले त्यावेळी शाहू छत्रपती धाऊन आले आहेत. आज देशातील परिस्थिती पाहता जात पात, पक्षभेद विसरुन शाहूंची उमेदवारी ही जनतेच्या रेट्याखाली झाली असून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
आमदार सतेज पाटील म्हणाले, लोकसभेची निवडणूक खिलाडूवृत्तीने व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू असताना विरोधकांकडून शाहू महाराजांचा सन्मान बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्या वृत्तीला जनता चोख उत्तर देईल, असा इशारा दिला.
शाहू महाराज म्हणाले, कोल्हापूरातील माजी महापौर आणि माजी नगरसेवकांनी मला पाठिंबा दिला, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. यापुढे कोल्हापूरच्या विकासासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायचे असून कोल्हापूरच्या विकासातील कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य द्यायचे यासाठी नगरसेवकांचा सल्ला महत्वाचा ठरणार आहे. नगरसेवकांनी भरपूर कामे केली असून त्यातील एकादे काम राहिले असेल तर त्याचा पाठपुरावा केला जाईल.











