महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर झाले आहे. महाविकास आघाडीत शिवसेना सर्वाधिक २१ जागा लढवणार आहे. काँग्रेस १७ उमेदवार देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १० जागा लढवणार आहेत. या जागा वाटपावरुन काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मुंबईत जागा न मिळाल्याने माजी मंत्री वर्षा गायकवाड नाराज आहेत. यासंदर्भातील नाराजी त्यांनी जाहीरपणे मांडली होती. तसेच सांगलीमधील जागा काँग्रेसला मिळाली नाही. या जागेवर उद्धव ठाकरे यांनी जागा वाटपापूर्वीच उमेदवार जाहीर केला होता. ती जागा उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहिली. त्यावरुन काँग्रेस नेते विशाल पाटील नाराज झाले असून त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची तयारी चालवली आहे. यामुळे काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक नागपुरात बोलवण्यात आली आहे.
सांगलीतील तिढा सोडवण्यासाठी दिल्लीतून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला नागपुरात दाखल झाले आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक बोलवण्यात आली. त्यासाठी आमदार विश्वजीत कदम आणि आमदार विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील यांना तातडीने नागपूरकडे येण्याचे निरोप देण्यात आला आहे. सोमवारी रात्री 9 वाजता नागपूरमध्ये बैठक होणार आहे. त्यासाठी त्यांना बोलवले आहे. या बैठकीत काँग्रेस नेते चेन्निथलासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थिती राहणार आहे.
विशाल पाटील अर्ज दाखल करणार
काँग्रेस नेते विशाल पाटील मंगळवारी सांगली लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलवली आहे. सांगलीत महाविकास आघाडी म्हणजेच उबाठा शिवसेनेकडून पैलवान चंद्रहार पाटील रिंगणात उतरले आहे. भाजप उमेदवार संजय काका पाटील निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे सांगतील लढत तिरंगी होणार आहे. विशाल पाटील यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीचा उमेदवार अडचणीत येणार आहे.