गोळीबाराच्या घटनेनंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; काय झाली चर्चा?

0
2

घराच्या परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आल्यानंतर राज्याच्या गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सकाळी सलमान खानशी फोनवरुन संवाद साधून त्याची विचारपूस केली होती. यानंतर आता राज ठाकरे हे सलमान खानच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वीच श्रीकांत शिंदे यांनीही सलमान खानची भेट घेतली होती. सध्याचे चित्र पाहता सलमान खानच्या घरावरील गोळीबाराची घटना महाराष्ट्रातील शीर्षस्थ नेत्यांनी गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे.

राज ठाकरे रविवारी संध्याकाळी अचानकपणे सलमान खानचे निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट येथे पोहोचले. आता राज ठाकरे आणि सलमान खानमध्ये काय चर्चा होणार, हे पाहावे लागेल. यापूर्वी हिट अँड रन केस न्यायालयात असतानाही राज ठाकरे यांनी सलमान खानची भेट घेतली होती.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर दोन अज्ञांताकडून चार राऊंड फायर झाल्याची माहिती प्राथमिक माहिती मिळाली. पहाटेच्या सुमारास दोन जणांची दुचाकीवरून येऊन गोळीबार केल्याची माहिती आहे. वांद्रे पोलीस, गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम सध्या घटनास्थळी तपास करत आहेत. यावर राजकीय वर्तुळातून देखील टीकेची झोड उठू लागली. त्यातच आता राज ठाकरे यांनी सलमान खानची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

गोळीबार प्रकणानंतर राजकीय वातावरण तापलं

यावर राजकीय वर्तुळातून गृहमंत्रालयावर बोट ठेवण्यात आलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत जर भर रस्त्यात गोळीबार होत असेल तर अब की बार गोळीबार सरकार वर शिक्का मोर्तब झाला असल्याचं म्हटलं आहे. या घटनेवरून काही जण राजकीय पोळी भाजण्याचं काम करत असल्याचे म्हणत गिरीश महाजन यांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

भाईजानच्या घराबाहेरील गोळीबाराचा बिश्नोई गँगशी संबंध?

सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांचं पथक दाखल झालं असून फॉरेन्सिक टीमही दाखल झाली आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळाची पाहणी आणि तपास करण्यात येत आहे. आजच्या गोळीबाराचा बिश्नोई गँगशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिश्नोई गँगकडून सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.