मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची थेट घोषणा करून टाकली. यातून भाजपने अप्रत्यक्षरीत्या ठाण्यावर दावा केला असून त्यामुळे शिंदे यांची कोंडी झाल्याची चर्चा रंगली आहे.






पक्षातील अन्य खासदारांच्या उमेदवारीविषयी स्पष्टता येत नाही, तोवर श्रीकांत यांची उमेदवारी जाहीर करायची नाही असा निर्णय शिंदे यांनी घेतला होता. शिवाय, ठाण्याची जागा कोणाला मिळते, यावर पुढील व्यूहरचना अवलंबून होती. ठाणे किंवा कल्याण यापैकी एक जागा सोडावीच लागली, तर कल्याणवर पाणी सोडून श्रीकांत शिंदेंना ठाण्यात आणण्याची रणनीती शिंदे गटाने आखली होती. मात्र ठाणे पदरात पडावे यासाठी फडणवीस प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबईचे नेते गणेश नाईक यांची बाजू वरचढ असल्याचा दावा सर्वेक्षणाच्या आधारे केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी फडणवीस यांनी नागपुरातून परस्पर जाहीर करून टाकली. यामुळे आता भाजपने ठाण्यावरील दावा आणखी प्रबळ केल्याचे बोलले जात आहे.
वेगवेगळया सर्वेक्षण अहवालांचा दाखला देत यापूर्वीच भाजपने खासदारांची तिकिटे कापण्यास शिंदे यांना भाग पाडले आहे. कृपाल तुमाने (रामटेक), भावना गवळी (यवतमाळ-वाशिम), हेमंत पाटील (हिंगोली) या तीन खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली असून हेमंत गोडसे (नाशिक), धैर्यशील माने (हातकणंगले) यांना डच्चू देण्यासाठी दबाव आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात गेल्या वर्षभरापासून शिवसेनेकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत निवडणुकीची तयारी करत असताना तेथे अचानक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव पुढे आले. असे असताना ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटता सुटत नसल्याने शिंदे सेनेतील अस्वस्थता टोकाला पोहचली आहे.
मुख्यमंत्र्यांसाठी ठाणे महत्त्वाचे का?
शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे शिष्य म्हणून मुख्यमंत्री ठाण्यातील राजकारण करत असतात. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे अशा दिग्गज नेत्यांकडून ठाणे शिवसेनेला मिळवून देणाऱ्या आनंद दिघे यांच्या शिष्याने मतदारसंघ भाजपच्या दावणीला बांधल्याचा प्रचार विरोधक करू शकतात. हे शिंदे यांना परवडणारे नाही. दिघे यांनी सीताराम भोईर यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराकरवी गणेश नाईक यांचा परभव घडवून आणला होता. आता त्याच नाईकांसाठी मुख्यमंत्र्यांना प्रचार करावा लागू शकतो. यामुळे ठाणे केंद्रित राजकारणाचा मुख्यमंत्र्यांचा पाया खिळखिळा होण्याची भीती पक्षाला सतावते आहे.
ठाणे हे शिवसेनेचे असून ते शिवसेनेकडेच राहिले पाहिजे अशी भूमिका आम्ही पक्षांतर्गत मेळाव्यात मांडत आहोत. तसेच उमेदवारही शिवसेनेचा असायला हवा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे.
– नरेश म्हस्के, नेते, शिंदे गट
ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळायला हवा असा आमचा आग्रह आहे. शिवसेनेच्या चिन्हावर भाजपचा उमेदवार लढण्याऐवजी कमळाच्या चिन्हावरच लढविण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.
– संजय केळकर, आमदार, भाजप











