महायुतीच्या ‘वर्षा’वर हायव्होल्टेज बैठका, मुख्यमंत्र्यांच्या लेकाचा मतदारसंघही धोक्यात? उमेदवार बदलाची चर्चा…

0

भाजप आणि शिवसेना महायुतीमध्ये जागावाटपाच्या फेऱ्या सातत्याने होत असून महायुतीच्या उमेदवाराला मतदारसंघातील नव्याने निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा फटका बसू नये, यासाठी पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत जवळपास साडेतीन तास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित असल्याने ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाविषयी चर्चा झाल्याचे समजते.

दरम्यान, शिवसेनेचे काही उमेदवार बदलण्याची शक्यताही नाकारण्यात येत नाही. तसे संकेतही पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली असली, तरी महायुतीची राज्यातील जागावाटपाची कोंडी संपलेली नाही. त्यामुळेच वाद असलेल्या जागा सोडून महायुतीमधील तिन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

ज्या जागांवर वाद आहेत, त्यावर तोडगा काढण्यासाठी महायुतीमधील शिवसेना-भाजपच्या नेत्यांच्या सातत्याने ‘वर्षा’वर बैठका पार पडत आहेत. शनिवारी तब्बल साडेतीन तास खलबते झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार संजय शिरसाट आदी उपस्थित होते.

श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण येथील जागेवर भाजपकडून दावा केला जात असल्याचे समजते. श्रीकांत शिंदे यांना कल्याणऐवजी ठाणे येथून उमेदवारी देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. महायुतीच्या उमेदवारांविषयीचे नवनवी सर्वेक्षणे करून त्याची तुलना मतदारसंघातील परिस्थितीशी करण्यात येत आहे.

ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत, तसेच जिथे उमेदवार जाहीर करायचे आहेत, याविषयीही सातत्याने परिस्थिती पडताळून पाहिली जात आहे. त्यामुळे एखादा उमेदवार बदलला गेल्यास त्याविषयी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. याविषयी शिवसेनेकडूनच दुजोरा मिळाला आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

एखादा उमेदवार कमजोर वाटत असल्यास तो बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. एखादा उमेदवार बदलला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रातील एखादा उमेदवार बदलला जाऊ शकतो, असेही शिरसाट यांनी सांगितले. त्यामुळे आता जे उमेदवार जाहीर केले आहेत त्यापैकी एखादा उमेदवार बदलला जाणार की, ज्या विद्यमान खासदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे त्यांच्यापैकी एखादा उमेदवार बदलणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.