राजू शेट्टी यांनी पाठिंबा न घेतल्यास उमेदवार देणार, हातकणंगले लोकसभेसाठी मविआची स्ट्रॅटेजी ठरली!

0

एकीकडे माजी खासदार राजू शेट्टी हे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा सुरु असताना, ही चर्चा फिसकटल्याचं दिसतंय. कारण महाविकास आघाडी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसे सूतोवाच केले आहेत. राजू शेट्टी यांनी पाठिंबा घेतला नाही तर आम्हाला उमेदवार द्यावा लागेल, असं जयंत पाटील म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते.

सांगलीत शिवसेनेने उमेदवार घोषित केला आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उतरवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मात्र त्याला काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. सांगलीची जागा काँग्रेसची असल्याची भावना वेळोवेळी काँग्रेस नेत्यांनी बोलून दाखवली आहे. मात्र यात आणखी काही मार्ग निघतो का याचे प्रयत्न सुरू आहेत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

राजू शेट्टी यांची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया

दरम्यान, जयंत पाटील आणि मविआच्या भूमिकेनंतर राजू शेट्टी यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली. राजू शेट्टी यांची एकला चलोरीचीच भूमिका असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर पुन्हा कुणाशी बोलणं झालं नाही. जर भाजपचा पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीने उमेदवार उभा करू नये. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मी उभा राहणारच, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.