पुणे काँग्रेसमध्ये जेष्ठ नेत्याच्या ‘लेटरबॉम्ब’ची खळबळ; जाहीर सभा घ्या अन् कोण उमेदवार हे जनतेला विचारा

0
आबा बागूल

पुणे : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आहेत. जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. पुण्यात देखील काँग्रेसचा उमेदवार अजून ठरत नाही. आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र आता या इच्छुकांचे धाबे काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याच्या लेटरबॉम्बमुळे दणाणले आहेत. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी थेट लोकसभेसाठी उमेदवार ठरवताना जनतेचा कौल घेण्याची मागणी केली आहे.

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना पुणे काँग्रेसमधील उमेदवाराचा तिढा सुटण्याऐवजी या लेटर बॉम्बमुळे आता हा तिढा आणखीनच वाढला आहे. आबा बागुल यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून जाहीर सभेतून पुणेकरांचा कौल घ्या नंतरच पुणे लोकसभेचा उमेदवार ठरवावा अशी विनंती केली आहे. आबा बागुल यांच्या या पत्रामुळे गेल्या काही काळापासून काँग्रेसमध्ये चाललेल्या अंतर्गत वादाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. यामुळे पुढील काळात पुणे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून भडका उडण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

आजी-माजी आमदार, पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश असलेली २० जणांची यादी प्रदेश काँग्रेसला पाठवण्यात आली आहे. या वीस जणांची यादी पाठवत असताना किंबहुना या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या ४० वर्षापासून काँग्रेसमध्ये ऍक्टिव्ह असणारे आणि  ६वेळा नगरसेवक असणाऱ्या आबा बागुल काहीसे दूर होते. काँग्रेसच्या बहुतांश बैठकीला आबा बागुल हे गैरहजर होते. अशात पुढील काही दिवसात उमेदवारी जाहीर होणार असतानाच आबा बागुल यांनी लेटर बॉम्बचे हत्यार उपसले आहे. या लेटर बॉम्बमुळे पुणे काँग्रेसमधील चलबिचल वाढून अंतर्गत वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

काय आहे पत्र?

लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच प्रक्रिया सुरु होणार आहे. आचारसंहिता लागू होण्यास अजून अवधी आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षासाठी महत्वाचा आहे. आज जरी तो भाजपच्या ताब्यात असला तरी हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून घेणे सहज शक्य आहे. त्यासाठी पुणेकरांच्या मनात कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी मी जाहीर सभा घेतो. या सभेला हजारोच्या संखेने पुणेकर नागरिक उपस्थित राहतील. पुणेकर मतदार सुज्ञ आहेत. ते जो कौल देतील, त्यानुसार पुणे लोकसभेसाठी उमेदवार ठरवा. तुम्ही फक्त या सभेत मार्गदर्शन करा आणि पुणेकरांचा कौल कुणाला आहे हे जाणून घेऊनच लोकसभेसाठी उमेदवार ठरवा.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

मी गेली ४० वर्षाहून अधिक काळ काँग्रेस पक्षाचे कार्य करीत आहे. तब्बल ३० वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून सक्रिय आहे. प्रभागच काय वॉर्ड रचना बदलूनही सलग ६वेळा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेलो आहे. शहर विकासाचे व्हिजन आणि काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे याची मला सदैव जाण असल्यानेच जनतेनेही भरभरून मतदान केलेले आहे. त्यामुळेच ६टर्म लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांनी स्वीकारले आहे आणि काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ यावर जनमानसातूनच शिक्कामोर्तब झाले आहे.

मला समाजकारण -राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आहे. मी खात्रीपूर्वक नमूद करतो की, यंदा पुणे लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल. त्यासाठी जनमताचा कौल घ्या, जाहीर सभा घेण्यास मला निर्देश द्या, मी सक्षम व तयारीत आहे. तसे झाल्यास पुणेकरांचा कौलही कळेल आणि निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाची वातावरण निर्मितीही होईल. कृपया आपण आता गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा ही विनंती. आणि त्यानुसारच ‘कौल पुणेकर मतदारांचा, उमेदवार महाविकास आघाडीचा’ हे सूत्र लोकसभेसाठी यंदा अवलंबावा ही विनंती.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

जर तेच ते ‘यशस्वी कलाकार’ (मोठ्या मताधिक्क्याने पराभूत झालेले) पुन्हा लोकसभेसाठी दिल्यास निकालही नेहमीप्रमाणे ‘यशस्वी’च लागेल. हेच कलाकार आपल्यापुढे वेगळे चित्र निर्माण करतात आणि नंतर जबाबदारीही पेलत नाहीत, घेत नाहीत आणि पराभव झाल्यानंतर मौनव्रतात जातात. परिणामी सर्वांचेच श्रम वाया जातात. गेली अनेक वर्षे शहरात याच मंडळीना जनमताचा कौल मिळाला नाही व मतदारांमध्ये परिवर्तन ही करता आले नाही हेच चित्र आहे. त्यामुळे आता गांभीर्याने विचार करून काँग्रेस पक्ष पर्यायाने राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी, राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे आणि आपण स्वतः यांचे हात बळकट करण्यासाठी ‘कौल पुणेकर मतदारांचा, उमेदवार महाविकास आघाडीचा’ हे सूत्र यंदा अवलंबून जाहीर सभेतून पुणेकरांकडून मिळणाऱ्या कौल नुसार उमेदवार ठरवावा ही पुनश्च विनंती, असे म्हणणे आबांनी पत्रातून मांडले आहे.