छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये निधी वाटपाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर सत्तेत असलेल्या प्रत्येक आमदाराला जास्त निधी मिळतो असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे.
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सत्तार यांच्या मतदारसंघातील एका विकास कामाच्या निधीचा मुद्दा उपस्थित झाला आणि दानवे यांनी निधी वाटपामध्ये विरोधातल्या आमदारांवर अन्याय केला जातो असा आरोप केला. त्यानंतर पालकमंत्री भुमरे आणि पणन मंत्री सत्तार यांनी दानवे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला आणि वाद पेटला.
एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत यांची मजल गेली होती त्यामुळे या बैठकीत चांगलाच गोंधळ उडाला. या बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा वाद झाल्यानंतर “प्रत्येकाला वाटतं आम्हाला निधी जास्त मिळाला पाहिजे. पण जो सत्तेत असतो त्याला निधी जास्त मिळतो हा अलिखित नियम आहे. पुर्वी तुम्हाला जो निधी मिळत होता त्यामध्ये कमतरता झाली नाही मग आता तुम्हाला वाढीव निधी कशाला पाहिजे?” असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून आता चांगलीच चर्चा रंगली आहे.
“पालकमंत्री सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. कन्नडच्या आमदाराने आरोप केला की, माझ्या मतदारसंघात एकही पैसा आला नाही. त्यानंतर पालकमंत्र्यांनी सांगितलं की, कलेक्टर यांच्याकडून तुम्हाला लेखी उत्तर मिळेल, तरीही त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला” असं मत सिरसाट यांनी माध्यमांना बोलताना व्यक्त केलं.