शाहांच्या दौऱ्यात अचानक बदल अन् मुख्यमंत्र्यांची धावपळ; नातेवाईक आजारी असल्याने…

0

पुणेः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नियोजित दौऱ्यात अचानक बदल झाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धावपळ झाली. उद्या पिंपरी चिंचवड येथे सहकार विभागाच्या कार्यक्रमासाठी अमित शाह पुण्यात दाखल झालेले आहेत. शनिवारी सायंकाळी अमित शाह पुण्यात दाखल झाले खरे परंतु नियोजित वेळेच्या एक तास आधी यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील त्यांचे इतर कार्यक्रम आवरते घेत विमानतळाच्या दिशेने धाव घ्यावी लागली.

केंद्रीय मंत्री अमित शाह हे रविवारी (ता. ६) पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात ‘सहकार से समृद्धी’ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यासाठी शाह हे शनिवारी रात्री आठ वाजता पुण्यात येणार होते. मात्र, त्यांचा दौरा अचानक बदलला. शाह हे सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास लोहगाव विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रकांत पाटील यांना तेथे लवकर पोहचावे लागले. तसेच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

शाह यांचे नातेवाईक आजारी असल्याने त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ते लोहगाव विमानतळावरून थेट सॅलिसबरी येथे त्यांच्या घरी गेले. सुमारे एक तासभर शाह हे तेथेच होते. त्यानंतर नऊच्या सुमारास सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेलमध्ये मुक्कामासाठी पोचले, अशी माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, शाह हे रात्री आठ वाजता येणार असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचे साडेसहा वाजता लोहगाव विमानतळावर आगमन होऊन ते हॉटेलमध्ये जाणार होते. पण हा नियोजनात बदल झाल्याने ते विमानतळावरच थांबले. चंद्रकांत पाटील यांनीही त्यांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेपाच वाजता ढोल-पथकांच्या वाद्य पूजनाचा कार्यक्रम बाजीराव रस्त्यावरील नूमवी प्रशालेत कार्यक्रम होता, पण पाटील हे सायंकाळी पावणे पाच वाजताच या ठिकाणी पोचले. काही वेळ तेथे थांबून ते विमानतळाकडे रवाना झाले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

अमित शाह यांच्या दौऱ्यात बदल झाल्याने प्रशासनाचीही चांगलीच धावपळ झाली. शहा हे सॅलिसबरी पार्क भागात जाणार असल्याने सातारा रस्त्यावर अनेक ठिकाणी पोलिस होते. शहा यांच्या वाहनाचा ताफा जाण्यासाठी काही वेळ वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यामुळे संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत स्वारगेटपासून पुढे सातारा रस्ता व परिसरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.