बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज (2 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास यांनी कर्जतमधील ND स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई हे दिल्लीतून परतले होते. त्यानंतर ते आपल्या एनडी स्टुडिओमध्ये आले. यावेळी त्यांनी काही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या होत्या. त्या क्लिपमध्ये आर्थिक विवंचना असल्याचं आणि काही लोक त्यांना कसा त्रास देतात याचा तपशील असल्याची अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.






नितीन देसाईंची आत्महत्या अन् ‘त्या’ ऑडिओ क्लिप
नितीन देसाई यांनी काल व्हॉईस रेकॉर्डरचा वापर केला. या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये त्यांनी वेगवेगळे व्हॉईस नोट रेकॉर्ड करून ठेवले आहेत. यामध्ये चार उद्योजकांचा देखील उल्लेख त्यांनी केला असल्याचं समजतं आहे. काल रात्री 12 वाजता नितीन देसाई हे दिल्लीहून मुंबई विमानतळावर पोहचले. तिथून ते गाडीने थेट कर्जतच्या आपल्या एनडी स्टुडिओमध्ये साधारण पहाटे अडीच वाजेच्या सुमारास पोहचले. इथे आल्यानंतर त्यांनी स्टुडिओतील मॅनेजरशी बोलणं केलं आणि त्याला सांगितलं की, मी तुला सकाळी एक व्हॉइस रेकॉर्डर देईन. तो व्हॉईस रेकॉर्डर तू संबंधित लोकांना दे. सकाळी उठल्यानंतर त्याने आधी नितीन देसाई यांचा शोध घेतला.
पण ते त्यांच्या रूममध्ये नव्हते. त्यानंतर तो मेगा हॉलच्या परिसरात गेला. जिथे त्याला नितीन देसाई हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. तिथेच त्यांनी आपल्या मोबाइलमध्ये व्हॉइस रेकॉर्डर ठेवला होता. ज्याचा उल्लेख देसाईंनी आपल्या मॅनेजरकडे केला होता. तो व्हॉईस रेकॉर्डर आता पोलिसांकडे जमा आहे.
‘त्या’ व्हॉईस रेकॉर्डरमध्ये नेमकं काय?
त्या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये काही व्हॉईस नोट्स आहेत. ज्यामध्ये चार उद्योजकांचा उल्लेख आहे. कशा प्रकारे त्यांना छळण्यात आलं याचा उल्लेख असल्याचं समजतं आहे. त्या चार उद्योजकांनी आर्थिक व्यवहार झाल्यानंतर त्यांच्यावर कसा दबाव आणला होता. हे सगळे तपशील त्या व्हॉईस नोटमध्ये देसाई यांनी रेकॉर्ड केले आहेत.
याचा तपास फॉरेन्सिक टीम आता करत आहेत. तसंच घटनास्थळी डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट एक्सपर्टही आले आहेत. हे व्हॉईस रेकॉर्डर या संपूर्ण घटनेतील महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळे पोलीस या निष्कर्षावर पोहचतील की, त्यांच्यावर दबाव होता का.. तसेच त्यांना आत्महत्येसाठी कोणीकोणी प्रवृत्त केलं.
याबाबत एकाच ठोस माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून आत्महत्येला प्रवृत्त केल्या गेलेल्या लोकांवर संबंधित गुन्हे दाखल होतील. पोलीस या संदर्भात लवकरच गुन्हा दाखल करणार आहेत.











