पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर करण्यात आला आहे. तो स्वीकारण्यासाठी ते पुण्यात येत आहेत. मात्र विरोधकांना पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. आंदोलन करू नये म्हणून या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाच्या नेत्यांना या नोटिसा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावेळी आंदोलनाचा इशारा दिल्याने पुणे पोलिसांची प्रशांत जगताप यांना नोटीस बजावली आहे. प्रशांत जगताप यांना आंदोलन न करण्याची पुणे पोलिसांनी नोटीस दिली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १४९ नुसार पुणे पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्ष उद्या पुणे शहरात करणार आंदोलन आहेत.
पोलिसांनी नोटीसमध्ये काय म्हटलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे भेटीस येत आहेत. त्यांच्या विरोधात आंदोलन, मोर्चे, किंवा काळे झेंडे दाखवुन निषेध व्यक्त करणार असलेबाबत गोपनिय माहिती प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाणे आपणास नोटीस देण्यात येते की, शांतता व सुव्यवस्था राखणेकामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. त्या अनुषंगाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येतील असे सर्व प्रकारचे रास्ता रोको व आंदोलने इत्यादींना मनाई आहे.
सध्याची राजकीय परिस्थीती पाहता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपण कोणत्याही प्रकारचे आंदोलन, मोर्चे, निषेधाचे काळे झेंडे दाखवून आंदोलन करु नये. आपल्या सहकार्यांकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणत्याही प्रकारे वरील संदर्भातील आदेशाचा भंग होईल असे वर्तन करु नये. अगर व्यक्ती, राजकीय पक्षाविषयी प्रक्षोभक वक्तव्य घोषणाबाजी किंवा व्यकीतिचे पुतळे अगर प्रतिमांचे प्रदर्शन असे गैरकृत्य करु नये, असे केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणाला वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येऊन आपले विरुद्ध प्रचलित कायद्यान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.