शिक्रापूर, ता. १३ ः केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) परीक्षेच्या तयारीने उत्तम बाह्यज्ञान, प्रभावी पर्सनॅलिटी, आश्वासक संवाद आणि थेट पवार साहेबांसोबतच चर्चा करतानाचा फोटो या बळावर उत्कर्ष मारुती सातकर या सातकरवाडीच्या (ता. शिरूर) पठ्ठ्याने रांजणगाव गणपती येथील एकाला वाइन शॉपचा बनावट परवाना देत तब्बल ५३ लाखाला तर गंडविलेच शिवाय अशाच पद्धतीने त्याने तब्बल १८ जणांना फसविल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना समजताच थेट दिल्लीतील त्याच्या घरातून उचलबांगडी केली.
वाइन शॉपचा परवाना देतो म्हणून ५३ लाख रोख उकळून बनावट परवाना देत उत्कर्ष सातकर याने राहुल अनिल पवार (वय ३१, रा. शेरेवस्ती, रांजणगाव, ता. शिरूर) याला फसविल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी शिक्रापूर पोलिसांकडे दाखल झाली होती. यावर पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी उत्कर्ष याची गोपनीय माहिती हेमंत कुंजीर व कर्मचाऱ्यांकडून घेतली अन् अनेक धक्कादायक माहिती त्यांना मिळाल्याने त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार, हेमंत कुंजीर व एस. व्ही. निंभोर यांचे तपासपथक तयार करुन उत्कर्षच्या मागावर सोडले असता तो दिल्लीत असल्याचे निदर्शनास आले. क्षीरसागर यांनी तत्काळ हे तपासपथक थेट विमानानेच दिल्लीत पाठविले आणि आपल्या परप्रांतीय पत्नीसोबत राहत असलेल्या छतरपूर (दिल्ली) येथून उत्कर्षला घरीच जेरबंद केले.
दरम्यान, आरोपी उत्कर्ष याला शिक्रापूरात आज (ता. १३) पहाटे तीनच्या सुमारास आणले असून, प्राथमिक तपास केला असता त्याने अशाचप्रकारे सुमारे १८ जणांना फसविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या गुन्हे करण्याच्या कार्यपद्धतीत तो निवडलेल्या सावजाला त्याचे जनरल नॉलेज, प्रशासकीय माहिती आणि पवार साहेबांसोबतचे फोटोंमुळे प्रभावित करीत असे. वाइन शॉप, बिअर बार अशांचा परवाना, सरकारी बदल्या, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अशी कामे करीत असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने पत्रेही तो लोकांना देत असे.
फसवणूक झालेल्यांनी साधावा संपर्क
दाखल प्रकरणात आई संध्या सातकर व पत्नी अंकिता सातकर या आरोपी म्हणून आहेत. मात्र राहुल पवार सह अन्य प्रकरणात त्यांचा सहभाग किती, ते निष्पन्न करायचे आहे. अर्थात पत्नी अंकिता ही दिल्लीत स्टेट बॅंकेत कामाला असल्याची प्राथमिक माहिती असून, उत्कर्ष हाही दिल्लीत राहून हे उद्योग करीत असल्याने त्याच्या गुन्ह्यांची व्याप्ती किती व कशी, हे जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपासात सुरू असून, ज्यांची अशा पद्धतीची फसवणूक झाली आहे, त्यांनी तत्काळ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर (९०७७१००१००) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.