राष्ट्रवादी फुटीनंतर बारामती लोकसभा समीकरणं बदलली; पवारांची कन्या सुळेंना हे मोठं आव्हानं

0

महाराष्ट्रामध्ये एका वर्षात दोन राजकीय भूकंप झाले. आधी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली तर आता अजित पवारांच्या बंडाने राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असतानाच भाजपच्या गळाला एकनाथ शिंदे आणि अजित पवार लागल्यामुळे निवडणुकीचं समीकरणं बदललं आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रातून लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत, त्यामुळे 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातून 45+ चं टार्गेट ठेवलं आहे.

अजित पवारांच्या बंडाआधीच भाजपने शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीवर लक्ष केंद्रीत केलं होतं, त्याचाच भाग म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि भाजपचे वेगवेगळे केंद्रीय नेते बारामतीच्या दौऱ्यावर वारंवार येत आहेत. आता अजित पवारांनीच बंडाचा झेंडा उगारल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीची जागा किती कठीण झाली आहे? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सहा विधानसभा मतदार संघ आहेत, ज्यात बारामती शहर, दौंड, इंदापूर, पुरंदर, खडकवासला आणि भोर यांचा समावेश आहे.

बारामतीमध्ये अजितदादांची रसद

2014 साली मोदी लाटेमध्ये सुप्रिया सुळे 50 हजार मतांनी निवडून आल्या, पण 2019 साली त्यांची आकडेवारी दीड लाखांनी वाढली. भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल या सुप्रिया सुळेंविरोधात बारामतीमधून उभ्या होत्या. 2019 ला सुप्रिया सुळेंना बारामती शहरातूनच मोठी आघाडी मिळाली. सुप्रिया सुळेंना बारामती शहरात जवळपास पावणेदोन लाख मतं मिळाली, तर कांचन कुल यांना फक्त 47 हजार मतं पडली, यावेळी मात्र बारामतीमधून अजित पवार भाजपला रसद पुरवणार आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

बारामतीनंतर सुप्रिया सुळेंना सगळ्यात मोठं मताधिक्य इंदापूरमधून मिळालं. सुप्रिया सुळेंनी इंदापूरमध्ये 1,23,573 तर कुल यांनी 52,635 मतं घेतली. भोरमध्ये सुप्रिया सुळेंना 1,09,163 आणि कांचन कुलना 90,159 मतं मिळाली. पुरंदरमध्ये सुळेंनी 1,04,872 आणि कुल यांनी 95,191 मतं घेतली. तर खडकवासलामध्ये सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसला, या भागातून त्या 65 हजार मतांनी पिछाडीवर राहिल्या. तर दौंडमध्येही त्यांना कुल यांच्यापेक्षा 7 हजार कमी मतं मिळाली. कुल यांनी 91,171 तर सुप्रिया सुळे यांनी 84,118 मत घेतली.

इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील

इंदापूरचे सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांसोबत आहेत. इंदापूरमधून काँग्रेसचे माजी मंत्री आणि दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2019 निवडणुकीत काँग्रेसमध्ये असताना हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे सुळेंना इंदापूरमध्ये महत्त्वाची आघाडी मिळाल्याचं बोललं जातं. पण विधानसभेवेळी हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणेंसमोर फक्त 3 हजार मतांनी पराभव झाला. यावेळी इंदापूरमध्ये आघाडी घेणं सुप्रिया सुळेंसाठी आव्हानात्मक असेल.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

पुरंदरमध्ये विजय शिवतरेंचा वेढा

पवारांचे कट्टर विरोधक मानले जाणारे पुरंदरचे विजय शिवतारेदेखील एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. 2019 निवडणुकीमध्ये शिवतारेंचा काँग्रेसच्या संजय जगताप यांनी पराभव केला. पुरंदर विधानसभा मागच्या बऱ्याच काळापासून पवारांच्या ताब्यात आलेली नाही. तसंच शिवतारे हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समजले जातात.

दौंडमध्ये राहुल कुल

बारामती लोकसभेमध्ये येत असलेल्या दौंड मतदारसंघामधून राहुल कुल हे 2014 आणि 2019 साली भाजपच्या तिकिटावर निवडून आले. एकेकाळी पवार कुटुंबाच्या जवळ असणारे राहुल कुल आता देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत. 2019 ला या मतदारसंघातून सुप्रिया सुळे पिछाडीवर होत्या.

भोरमध्ये संग्राम थोपटे

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

भोर मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना छोटी आघाडी मिळाली. या मतदारसंघात काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळेंना आघाडी मिळवून देण्यात मोठी मदत केली, पण 2020 नंतर थोपटे आणि पवार यांच्यातले संबंध खराब झाल्याचं बोललं जातं. नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, यानंतर या पदासाठी संग्राम थोपटे यांचं नाव आघाडीवर होतं. पण महाविकासआघाडी सरकार असताना परत विधानसभा अध्यक्षाची नेमणूकच झाली नाही. थोपटे समर्थकांनी यासाठी शरद पवारांना जबाबदार धरलं. थोपटेंची नाराजी अशीच कायम राहिली, तर याचा फटका सुप्रिया सुळेंना लोकसभा निवडणुकीत बसू शकतो.

खडकवासल्यात भाजपचा आमदार

बारामतीमधला शेवटचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या खडकवासलामध्ये राष्ट्रवादी सगळ्यात कमकुवत आहे. सुप्रिया सुळे या भागात 2019 ला 65 हजार मतांनी पिछाडीवर होत्या. विधासनभा निवडणुकीतही भाजपचा खडकवासलामध्ये विजय झाला.

बारामती लोकसभा मतदारसंघांमधल्या या सहा विधानसभा क्षेत्रांवर नजर टाकली तर प्रत्येक ठिकाणी सुप्रिया सुळे यांच्यासाठी आव्हानं उभी करण्यात आली आहेत, त्यामुळे लोकसभेचा पेपर पवार कन्येसाठी सोपा नसेल, असं बोललं जातंय.