भारतीय जनता पक्षाने मंगळवारी (दि. ४ जुलै) पंजाब, झारखंड, तेंलगाना या राज्यांसहित ४ राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. आता अशाही चर्चा आहेत की येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये गुजरात, मध्यप्रदेश, जम्मू-काश्मिरसहित आणखी ६ राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलेले जाऊ शकतात. एवढचं नव्हे तर मोदींच्या कॅबिनेटमध्ये देखील बदल केले जाऊ शकतात. पर्यटन मंत्री किशन रेड्डी यांना मंत्रिमंडळातून हटवून तेलंगाणा राज्याचे प्रदेशाध्यक्षपद दिले जाईल. अशाच प्रकारे काही नेत्यांचे मंत्रिपद काढून त्यांना पक्षाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. प्रदेशाध्याक्षाच्या पदाचा त्याग करणाऱ्या नेत्यांना मोदींच्या कॅबिनेटमध्ये जागा मिळू शकते. यामध्ये सीआर पाटील यांच्या नावाची जास्त चर्चा आहे.






मोदी सरकारमध्ये सीआर पाटील यांना जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीआर पाटील यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ जुलैमध्ये समाप्त होत आहे आणि आता त्यांना प्रमोशन मिळेल अशी चर्चा आहे. त्यांना मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये महत्वाची जबाबदारी मिळू शकते. त्यांना गुजरातमधील निवडणूकीचा चांगला अनुभव आहे. सीआर पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडीचा नेता समजले जाते. गुजरातमध्ये झालेल्या विक्रमी विजयानंतर पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील विजयाचे श्रेय सीआर पाटील यांना देत त्यांना मॅन ‘ऑफ द मॅच’ संबोधले. एवढचं नव्हे तर पाटील यांनी विजयानंतर डीनरचे आयोजन केले होते, ज्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. मोदींनी अशाच प्रकारे २०१४मध्ये उत्तरप्रदेशमध्ये लोकसभा निवडणूकीत जिंकलेल्या ७१ जागांचे श्रेय अमित शाह यांना दिले होते. त्यानंतर अमित शाह यांना पक्षाचे अध्यक्षपद देण्यात आले. त्यामुळे सीआर पाटील यांना पक्षात महत्वाची जबाबदारी मिळू शकते.
नरेंद्र मोदी आणि सीआर पाटील यांच्यातील नाते-
सीआर पाटील यांना विरोधी पक्षातील लोक मराठी म्हणून संबोधतात, पण त्यांचे गुजरात कनेक्शन जुने आहे. १९५५मध्ये पाटील यांचा जन्म जळगाव येथे झाला होता. ते किशोरावस्थेत गुजरातमध्ये स्थलांतरित झाले होते. त्यांचे वडील पोलिस सेवेत होते. त्यांनीही पोलिस दलात नोकरी केली होती.
मात्र, मोदींच्या संपर्कात आल्यावर १९८९मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तेव्हा मोदी गुजरात राज्यात महासचिव होते. त्यानंतर हळूहळू त्यांच्यात मैत्री वाढत गेली. सीआर पाटील हे मोदींच्या विश्वासातील मानले जातात. २०१९मध्ये त्यांना दिलेल्या प्रचाराच्या जबाबदारीवरुन याचा प्रत्यय येतो.











