राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना त्यांचा फोटो न लावण्याचे आदेश दिले आहेत. तसे विचारसरणीचा विश्वासघात करणाऱ्यांनी शरद पवार यांचे फोटो वापरू नये, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. दरम्यान अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना सुनावलं आहे.
शरद पवार आमच्यासाठी दैवत आहेत. पक्षाच्या अध्यक्षांच्या विरोधात आम्ही भूमिका घेतली नाही. मात्र काही लोक राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आमच्यासाठी त्रासदायक आहे. शेवटी पवारसाहेब हे आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. फूट पाडणारे लोक आता जनतेच्या समोर आले आहेत, असे मिटकरी म्हणाले.
पवारसाहेब जितेंद्र आव्हाड यांची खासगी मालमत्ता नाही. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो लावणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले.
मिटकरी म्हणाले, जितेंद्र आव्हाडांच्या एकट्याची शरद पवार मालमत्ता नाहीत. त्यांनी असे बोलू नये, माझी त्यांना विनंती आहे. तसेच अजित पवार यांनी स्वत: जागा घेऊन प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे कार्यालये उभारले आहेत. त्यामुळे कोणी तिथे दावे करु नये, असे देखली मिटकरींनी स्पष्ट सांगितले.