अजितदादांचं बंड कसं? ही INSIDE STORY; १ कार कोणतीही सुरक्षा न घेता दाखल

0

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकाच वर्षात दोनदा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, ज्यात अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. याशिवाय छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनाही मंत्रिपद मिळालं आहे.

मागच्या काही काळापासून अजित पवार सत्तेमध्ये सहभागी होतील, अशा चर्चा सुरू होत्या, पण अजित पवारांचं हे बंड यशस्वी कसं झालं? पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडल्या याची माहिती आता समोर आली आहे. अजित पवारांच्या बंडाची सुरूवात 29 जूनला आषाढी एकादशीच्या दिवशी झाली. याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा केली आणि शासकीय नियोजित कार्यक्रम आटोपले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर दाखल झाले. मुंबई विमानतळावर दाखल होताच त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटले. हे दोघं भेटल्यानंतर या ऑपरेशनला सुरूवात झाली.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या निवासस्थानी न येता थेट दिल्लीला दाखल झाले. यानंतर दोघंही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले. तिकडे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची बैठक होणार होती, पण या बैठकीला अचानक एक कार कोणतीही सुरक्षा न घेता निवासस्थानी दाखल झाली. त्या कारमधून अजित पवार आले होते आणि ते या बैठकीत सहभागी झाले.

जवळपास दोन ते सव्वादोन तास अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली. यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार, मंत्रिमंडळात कुणाला स्थान द्यायचं, राष्ट्रवादीच्या किती जणांना मंत्रिमंडळात घ्यायचं, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कशा लढवायच्या, या मुद्द्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

या बैठकीमध्ये सत्तेचं समिकरण कसं असणार, यावरही चर्चा झाली. कारण भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत, त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार आहेत, या सर्व आमदारांना सत्तेमध्ये सामावून कसं घ्यायचं? कारण राज्य मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 43 मंत्र्यांचा समावेश करण्यात येतो. या व्यतिरिक्त इच्छुक आमदार असतील तर त्यांना महत्त्वाची महामंडळं देण्यात येतील, ज्याला कॅबिनेटचा दर्जा असेल, यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. अजित पवारांसोबत जे आमदार येतील त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याची काळजी घेण्याचा प्रयत्नही दिल्लीतल्या बैठकीत करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीनेच हे ऑपरेशन राबवण्यात आलं. यानंतर अजित पवारांचा महायुतीमध्ये प्रवेश झाला. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी झाला असला तरी आता येत्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांचाही शपथविधी पार पडणार आहे, याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अजित पवारांसोबत आलेल्या खासदारांना एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय शिवसेनेलाही केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्य मंत्रिपद मिळेल, असं सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार