पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक (कात्रज डेअरी) संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार आज शुक्रवारी दुपारी चारनंतर पुण्यात इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. मागील महिन्यात केशरताई पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी पवार मुलाखती घेणार आहेत. पुणे जिल्हा दुध उप्तादक संस्थांकडून परस्पर दूध उचलणारे काही संचालकच अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरल्याने अजितदादांची कसोटी लागणार आहे.
मुळशीतील कालिदास गोपाळघरे, वेल्हे तालुक्यातील ज्येष्ठ संचालक भगवान पासलकर, जुन्नरमधील बाळासाहेब खिलारी, शिरुरमधील तरुण तडफदार संचालक स्वप्निल ढमढेरे, तर खेडमधील अरुण चांभारे हे उघडपणे अध्यक्ष होण्याच्या इच्छुकांमध्ये आहेत. आणखी तिघे छुप्या पध्दतीने दादांकडे आपल्यालाच अध्यक्ष करा; म्हणून फिल्डिंग लावून आहेत. या सर्व पार्श्वभूमिवर आज दुपारी चार वाजता अजित पवार यांनी आठही इच्छुकांसह सर्व संचालकांना बारामती होस्टेल इथे मुलाखतीसाठी बोलावले आहे. पुणे जिल्हा दूध संघावर (कात्रज डेअरी) संचालक असलेल्या अनेकांच्या थेट किंवा संबंधित खासगी डेअऱ्या आहेत. ही गोष्ट राष्ट्रवादीच्या वरिष्ठांसह सर्वांना माहिती आहेत. मात्र, राजकीय गणितं लक्षात घेऊन त्याबाबत सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असावे. मात्र, त्याचा परिणाम दैनंदिन दूध संकलनावर झाला आहे.
खरे तर पुणे जिल्ह्याचे एकुण सर्व दैनंदिन दुध संकलन सुमारे २१ लाख लिटर आहे. त्यातील जेमतेम १० टक्के दूध संकलनही पुणे जिल्ह्यातील सर्वात जुन्या पुणे जिल्हा दुध संघाकडे (कात्रज डेअरी) राहिले नसल्याचे वास्तव आहे. याला संघातील अनेक संचालकच जबाबदार आहेत, अशी कुजबुज जिल्ह्याच्या राजकारणात आहे. तशी ती अजित पवार यांच्या कानावरही गेल्याची माहिती आहे.
.… तेच मलईदार संचालक पुन्हा अध्यक्षपदासाठी रांगेत
दूध संघाचे दैनंदिन संकलन नेमके कशामुळे कमी होत आहे, याचा आढावा खुद्द अजितदादांनीच घेतला होता. त्यात असे दिसून आले की, काही संचालक संघाच्या संस्थांकडून परस्पर दूध उचलतात, ते परस्पर खासगी दूध संस्थांना विकतात. त्यातून प्रतीलिटर एक ते दीड रुपया नफा ते कमावतात. त्यामुळे पुणे जिल्हा दूध संघाला दैनंदिन फटका बसत आहे. वर्ष ते दीड वर्षांपूर्वी पुणे जिल्हा दुध संघाचे दैनंदिन दुध संकलन सुमारे २ लाख ४० ते २ लाख ५० हजार लिटर होते, ते आता जेमतेम १ लाख ६५ हजार ते १ लाख ८० हजारांच्या घरात आलेले आहे. या गोष्टींसाठी जे संचालक जबाबदार मानले जातात, तेच पुन्हा अध्यक्षपदासाठी दावेदारी करत आहेत. त्यामुळे संघाचे हित की राजकीय सोय यात अजित पवारांना निर्णय करावा लागणार आहे.
दूध संघातील घडामोडींवर भाजपचे लक्ष
पुणे जिल्हा दूध संघातील घडामोडींवर विरोधी पक्ष भाजपतील काही पदाधिकारी लक्ष ठेवून आहेत. काही दिवसांपूर्वी दूध संघाची चौकशीही लागल्याने पुणे जिल्हा दुध संघाचा अध्यक्ष निवडताना अजितदादांसाठी पहिल्यांदाच मोठे आव्हान उभे राहिलेले आहे, हे मात्र नक्की. कारण आजच्या मुलाखतींचा निकाल येत्या १२ जून रोजी जाहीर करुन त्याच दिवशी नव्या अध्यक्षाकडे संघाचा कारभार सोपवावा लागणार आहे.