अदानी ग्रुप आणि हिंडेनबर्ग प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 17 मे रोजी निकाल देताना सेबीला या प्रकरणाचा तपास 14 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. सेबीने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडे 6 महिन्यांचा वेळ मागितला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने 14 ऑगस्टपर्यंतच मुदत दिली असून आता सेबीला 14 ऑगस्टपर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण करायचा आहे.






काही महिन्यांपूर्वी अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग आणि अदानी ग्रुपवर फसवणुकीचे आरोप केले होते. हिंडेनबर्गने अदानी समूहावर फेरफार करून परदेशात पैसे पाठवल्याचा आरोप केला होता, जो अदानी समूहाने फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाला 14 ऑगस्टपर्यंत तपास पूर्ण करण्यास सांगितले आहे. याशिवाय अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे.
सरन्यायाधीश चंद्रचूड, न्यायमूर्ती नरसिंहा आणि न्यायमूर्ती पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. शेवटच्या सुनावणीपूर्वी सेबीने सर्वोच्च न्यायालयाकडे पुन्हा 6 महिन्यांची मुदत मागितली होती. आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सेबीने आपला युक्तिवाद केला. सेबीने सांगितले की, ज्या 12 सौद्यांची चौकशी केली जात आहे ते खूपच गुंतागुंतीचे आहेत.
कारण अनेक सौद्यांमध्ये अनेक-व्यवहार आहेत. अनेक देशी विदेशी बँका आणि ऑन-शोअर आणि ऑफ-शोअर संस्थांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी लागेल.











