जागावाटपाचा ‘हा’ फॉर्म्युलाच मविआ एकत्रचा संदेश देईल तीनही पक्षांनी तयार राहावे : काँग्रेस

0
3

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी कर्नाटकच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपावर प्राथमिक चर्चा झाली असून तीनही पक्षांनी समसमान म्हणजे १६ जागा प्रत्येकी तीन पक्षांनी लढवाव्यात, अशी आग्रही भूमिका मांडली आहे. याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे सूतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाल्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी आपल्या निवास स्थानी तीनही पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली हेाती. कर्नाटकातील विजयामुळे बूस्टर मिळालेल्या काँग्रेस नेत्यांनी जागावाटपासंदर्भात चर्चा करताना समसमान जागांचे सूत्र मांडले आहेत. त्याला तीन पक्षांकडून काय प्रतिसाद मिळाला, हे समजू शकलेले नाही. मात्र, काँग्रेस त्यावर आग्रही आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

एकत्र लढायचे असेल तर समसमान जागा वाटप व्हावे. महाविकास आघाडी एकत्र लढत असल्याचा संदेश त्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात द्यावा. आता जरी आमचा एकच खासदार महाराष्ट्रात असला तरी समसमान जागावाटप करून आपण एकत्र असल्याचे दाखवून द्यावे. सर्वांना समान जागावाटप करून त्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून येतील. एक-दोन जागांसंदर्भात तडजोड करण्याबाबत तीनही पक्षांनी तयार राहावे, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने या बैठकीत मांडली आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जागा वाटपासंदर्भातील ही प्राथमिक बोलणी आहे. त्यावर पुढे अजून कोणतीही चर्चा झालेले नाही. बैठकीला काँग्रेसकडून नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, नसीम खान, तर शिवसेनेकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीकडून खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सहभागी झाले होते

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे