पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याबाबत महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पुणे शहरातील राष्ट्रवादीचे गणित कसे जुळते यावर सर्व पक्षांची गणिते अवलंबून असून शहरातील सर्व युती आणि आघाड्या शरद पवार व अजित पवार यांच्या भूमिकांवर अवलंबून आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता प्रत्यक्ष बैठकींचे स्वरूप येत असून, पुढील दोन दिवसांत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी रात्री दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आघाडीबाबत बैठक पार पडल्याची माहिती आहे.






लागोपाठ बैठका
या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक पक्ष कार्यालयात होणार असून, यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या शक्यतेवर सविस्तर चर्चा होणार आहे. यासोबतच आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांवरही चर्चा करून काही नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोन्ही गटांत घडामोडींना वेग
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हेही पुण्यात येणार असून, ते स्वतंत्रपणे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत पदाधिकाऱ्यांची भूमिका काय आहे, किती नेते सकारात्मक आहेत आणि किती जण याला विरोध करत आहेत, याची माहिती ते जाणून घेणार आहेत. या चर्चेनंतर वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
एकत्र येण्याच्या चर्चा
विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपसोबत जाण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात लढले. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून जोर धरत आहे.
शहराध्यक्षांचा विरोध
दरम्यान, शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी एकत्र निवडणूक लढवण्यास स्पष्ट विरोध दर्शवला आहे. तर पिंपरी-चिंचवडमधील शहराध्यक्षांनी आघाडी व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. या परस्परविरोधी भूमिकांमध्येही दोन्ही गटांच्या वरिष्ठ नेत्यांकडून एकत्र येण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. विशेष म्हणजे, खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार गटासोबत जाण्याबाबत सकारात्मक मत व्यक्त केल्याची चर्चा आहे.
दोन दिवसांत विषय क्लीअर
मंगळवारी रात्री वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर आज आणि उद्या होणाऱ्या बैठका निर्णायक ठरणार आहेत. या बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार, याबाबत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील राष्ट्रवादीचे गणित कसे जुळते यावरती सर्व पक्षांची गणिते अवलंबून असून शहरातील सर्व युती आणि आघाड्या शरद पवार व अजित पवार यांच्या भूमिकांवर अवलंबून आहेत. पुढील दोन दिवसांत यावर अंतिम निर्णय होईल, असा दावा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.













