राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली आहे. 15 जानेवारीला यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. काल दिवसभर पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना (उबाठा)चे पदाधिकारी राष्ट्रवादीत सामील झालेले असतानाच ठाकरे सेनेचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.






संजोग वाघरेंनी शहराध्यक्ष पदासह सदस्यत्वाचाही राजीनामा दिला
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. शहराध्यक्ष संजोग वाघरेंचा लवकरचं भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. वाघेरे यांनी शहराध्यक्ष पदासह सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर येत्या एक-दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती संजोग वाघरेंनी दिली आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, लोकसभेला पराभव
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटातून त्यांनी मावळ लोकसभेची निवडणूक लढवली होती. महायुतीकडून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे त्यांच्यासमोर उमेदवार होते. बारणे विरुद्ध वाघेरे यांच्या सामन्यात श्रीरंग बारणे यांनी पुन्हा बाजी मारल्याचं पाहायला मिळालं होतं.
संजोग वाघेरे कोण आहेत?
माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे यांचे ते पुत्र आहेत.
संजोग वाघेरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर तीन वेळा नगरसेवक राहिलेत
महापौर म्हणून त्यांनी कारभार पाहिलाय
त्यांच्या पत्नी ही नगरसेविका होत्या
स्थायी समितीचे अध्यक्ष पद ही त्यांनी भूषवले आहे
संजोग वाघेरे राष्ट्रवादी चे सलग 8 वर्षे शहराध्यक्ष राहिलेत
शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून या कुटुंबाकडे पाहिलं जात होते
2024 च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
2024 च्या लोकसभेला मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांच्याकडून पराभूत
18 डिसेंबर शिवसेना ठाकरे गटाचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा
लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
राज्यात 29 महानगरपालिकांच्या निडणुकांचे बिगुल वाजले
राज्यात 29 महानगरपालिकांच्या निडणुकांचे बिगुल वाजले आहे. 15 जानेवारीला यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 16 जानेवारीला या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळं राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मोठ्या प्रमाणात सध्या भाजपमध्ये पक्ष प्रवेश होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.













