महापालिका निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढणार का ? याबाबत पुण्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. अखेर राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे थेट उत्तर दिले. “पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष समोरासमोर लढेल. भाजपने मागील ५ वर्षात पुण्यात चांगले काम केले आहे. त्यामुळे दोन्ही मोठे पक्ष वेगळे लढतील, फक्त ही लढत मैत्रीपूर्ण असेल.’ असे स्पष्ट करत फडणवीस यांनी भाजपसाठी “स्वबळा’चा नारा दिला.






पुणे महापालिकेच्या ५३ प्रकल्पांचे भूमीपुजन, उद्घाटन व लोकार्पणाचा सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झाला. या कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीबाबत फडणवीस म्हणाले, “आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती होईल. तर काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती देखील होईल. मात्र, पुण्यात व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. त्याविषयी अजित पवार यांच्याशी आमची चर्चा झाली आहे. पुण्यात भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष मोठे आहेत. भाजपने गेल्या पाच वर्षात पुण्याचा चांगला विकास केला आहे. त्यामुळे पुण्यात महायुती होणार नाही. मैत्रीपूर्ण लढत होताना दोघांमध्ये कटुता येणार नाही.’
मतदार यादीत झालेल्या गोंधळाविषयी फडणवीस म्हणाले, ” मतदार याद्यांमधील घोळ आम्हीच पुढे आणले आहेत. तेवढ्या कारणासाठी निवडणुका घ्यायच्या नाहीत, असे होणार नाही. वर्षानुवर्षे निवडणूक लढविणाऱ्यांना मतदारयादीमध्ये घोळ असतोच हे माहीत आहे. तरीही काहीही कारण सांगून निवडणुका पुढे ढकलण्याचा आग्रह धरणे योग्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी असायला पाहीजेत. मतदार याद्यांमधील घोळ संपविण्यासाठी निवडणूक आयोगाने भविष्यात या याद्या ब्लॉक चेनमध्ये टाकल्यास हा घोळ कमी होईल.’
मराठी पंतप्रधान पदाच्या विधानाबाबत फडणवीस म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री असून ते ज्येष्ठ नेते आहेत. पंतप्रधान कार्यालयाचे मंत्रिपदही त्यांनी सांभाळले आहे. अशाप्रकारे साक्षात्कार व्हायला लागले, तर मात्र त्याच्यात काही तरी काळे बेरे आहे हे ओळखले पाहीजे. असा विचार करून त्यांनी स्वतःला त्रास करून घेऊ नये.’
फडणवीस म्हणाले
स्थानिक स्वराज्य संस्थांचे कारभार प्रशासकामार्फत चालवणे हे लोकशाहीला अभिप्रेत नव्हते.
न्यायालयाच्या निर्णयामुळे दीर्घकाळ या संस्था निर्वाचित प्रतिनिधींविना.
कोणाला पक्षात घ्यायचे कोणाला नाही, हे पक्षाध्यक्ष व शहराध्यक्ष ठरवतील
एकमेकांचे उमेदवार घ्यायचे नाहीत, असे एकनाथ शिंदे व आमच्यात ठरले आहे
मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी फटका बसणार नाही
महापालिका निवडणुकीत मुंबईकर आमच्यासोबत असतील
५० टक्क्यांच्यावरील आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यालयाचा निर्णय आमच्यासाठी अंतिम.













