मुंबईच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधू एकत्र आल्याने अनेक चर्चा रंगल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित मुंबई महापालिका निवडणूक लढण्याचे जवळपास निश्चित केले आहे. त्यांची अधिकृत घोषणा होणे शिल्लक आहे. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपा महायुतीला पाठिंबा देताना दिसत होते. पण विधानसभेत एकही आमदार निवडून न आल्याने त्यांनी नाराजी बोलून दाखवली. त्यानंतर ते उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीसोबत असल्याचे दिसून आले. ठाकरे बंधू एकत्र येणे आणि मुंबई पालिका निवडणुकीत याचा परिणाम या दोन मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक भूमिका मांडली.






जिथे फायदा, तिथे ते जातात
“राज ठाकरे त्यांचे निर्णय स्वतः घेतात. त्या निर्णयांचा चांगला वाईट जो परिणाम होतो, तो त्यांना भोगावा लागतो. ते कुठेही असले तरी आमची मैत्री कायम राहते. आम्ही एकमेकांवर टीका करतो, पण वैयक्तिक संबंध आणि राजकीय संबंध यामध्ये फरक असतो. त्यांना त्यांच्या पक्षाचा फायदा जिथे दिसेल, तिथे ते जातील. त्यांना असं वाटत असेल की कदाचित महायुतीमध्ये जागा नाही. त्यामुळे ते दुसरीकडे गेले असावेत. राज ठाकरे यांना या निर्णयाचे कधीतरी चिंतन करावंच लागेल,” असे मत फडणवीसांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
राज ठाकरेंचा उपयोग केला जातोय
“महाविकास आघाडी असो किंवा उद्धव ठाकरे असो, कोणाचेही त्यांच्यावर प्रेम नाही. राजकीय गरज म्हणून किंवा दुसऱ्यावर टीका करण्यासाठी वक्ता मिळतो म्हणून राज ठाकरेंचा उपयोग हे लोक करतात. त्यामुळे कोणासोबत राहायचं हा निर्णय राज ठाकरे यांनीच करायचा आहे. आम्ही दोघांनी कधीही एकमेकांना राजकीय सल्ला दिला नाही किंवा त्यांच्याकडून राजकीय सल्ला घेतला नाही,” असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
ठाकरे ब्रँड एकच…
“ठाकरे ब्रँड हा एकच होता. ते म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. आता कोणीही ब्रँड असा दावा करू शकत नाही. दुसऱ्या कोणाजवळ ठाकरे ब्रँड नाही. आम्ही केलेले काम मुंबईकरांनी पाहिले आहे. सर्व निवडणुकांमध्ये मुंबई सातत्याने आमच्या पाठीशी आहे. कमी जागा लढवूनही जास्त जागा जिंकलेला भाजप मुंबईतला एक नंबरचा पक्ष आहे. आमची महायुती मजबूत आहे. मुंबईत आम्ही महायुतीत लढणार आहोत. महायुतीचाच महापौर मुंबईत होईल हे मी मुद्दाम सांगतो,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.













