पुणे भाजपच्या ‘मिशन १२५’ला धक्का; महायुतीची ही बंदी बाहुबलीचे स्वप्नभंग, मोठी फूट मात्र तूर्तास टळली

0

राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील मित्रपक्षांमध्येच उमेदवारांची पळवापळवी झाल्याने महायुतीच्या समन्वय समितीने आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घटक पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याच्या निर्णयाचा पुण्यात भाजपच्या ‘मिशन १२५’ला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’तील काही माजी नगरसेवक हे भाजपच्या संपर्कात होते. मात्र, या निर्णयाने ‘बाहुबली’चा स्वप्नभंग झाला असून, पुणे शहरात राष्ट्रवादी’तील फूट मात्र तूर्तास टळली आहे.

नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) या पक्षांनी एकमेकांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश दिल्याने महायुतीतील मित्रपक्षांमध्ये वादंग झाला. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तिन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी महायुतीच्या समन्वय समितीने घटक पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा पुण्यात भाजपला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अधिक वाचा  पुण्यात महायुतीची ताकद आणखी वाढली; पर्वती, खडकवासला, धायरी, वडगाव शेरीचे पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर

भाजपने पुणे महापालिकेत पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी ‘मिशन १२५’ जाहीर केले आहे. मागील महापालिका निवडणुकीत भाजपचे ९७ नगरसेवक निवडून आले होते. ही संख्या १२५ वर नेऊन बहुमत मिळविण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘राष्ट्रवादी’ फोडण्याची रणनीती भाजपने तयार केली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील २१ माजी नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार होता. मात्र, तत्पूर्वीच महायुतीच्या समन्वय समितीने प्रवेशबंदीचा निर्णय घेतल्याने संबंधित नगरसेवकांचे भाजपच्या तिकिटावर खात्रीने विजयी होण्याचे स्वप्न भंगले आहे. मात्र, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

अधिक वाचा  पुण्यातील बाहुबली माजी नगरसेवकांचे भाजप पक्षप्रवेश; 22 माजी नगरसेवकांच्या हाती ‘कमळ’ या प्रभागात गणिते बदलली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर महिन्यात पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेतल्या. त्यामध्ये पुणे महापालिका निवडणुकीत ‘मिशन १२५’ निश्चित करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत १२५ जागा मिळवण्याचे उद्दिष्ट निश्चित झाल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून चाचपणी सुरू करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्यात तत्कालीन शिवसेनेच्या पाच माजी नगरसेवकांना पक्षात घेण्यात आले. त्यामध्ये विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, प्राची अल्हाट आणि संगीता ठोसर यांचा समावेश आहे. शिवसेनेनंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला लक्ष्य केले. मागील निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे ३९ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी बहुतांश माजी नगरसेवक हे अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’त आहेत. त्यापैकी माजी २१ नगरसेवक भाजपाच्या जाळ्यात अडकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर त्या नगरसेवकांना प्रवेशासाठी भाजपचे दरवाजे उघडण्यात येणार होते. मात्र, आता महायुतीच्या घटक पक्षांतील प्रवेशबंदीचा समन्वय समितीचा निर्णय भाजपच्या ‘मिशन १२५’साठी अडचणीचा ठरला आहे. मात्र, अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’तील फूट टळणार आहे.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?