बायकोचा संबंधास आग्रह लैंगिक अक्षम पती संतापला; थेट बायकोच्या गुप्तांगावर… पुण्यात संतापजनक घटना

0

पुण्यात वैवाहिक आयुष्यातील मतभेदातून संतापाची परिसीमा गाठणारी एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. शरीरसंबंधाची मागणी केल्यावर पतीनेच पत्नीवर अत्याचार करत तिच्या गुप्तांगावर तसेच मांडीवर सिगारेटचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी पीडितेने येरवडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घटनेची पार्श्वभूमी

तक्रारदार 29 वर्षीय महिलेचा विवाह 11 एप्रिल 2025 रोजी येरवड्यातील 33 वर्षीय पुरुषाशी मुस्लिम पद्धतीने झाला. लग्नानंतरच्या पहिल्याच रात्रीपासून पतीचा व्यवहार संशयास्पद होता. हनिमून नाइटला तो “खूप थकलो आहे” असे सांगत झोपी गेला. पुढील काही दिवस पत्नीने पती नैसर्गिकरित्या पुढाकार घेईल, अशी अपेक्षा ठेवून वाट पाहिली. मात्र, पती तिच्यासोबत झोपला तरी शारीरिक नातेसंबंध ठेवण्यापासून तो सातत्याने दूर पळत होता.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

पत्नीने सौम्यपणे जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असता तिला लक्षात आले की पती लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे संकेत दिसत आहेत. तिने त्याला वैद्यकीय उपचारांचा सल्ला दिला असता पतीने “मी आधीच डॉक्टरांना दाखवलंय, काही प्रॉब्लेम नाही” असे सांगून उपचारांना नकार दिला. पुढेही पत्नीने पुढाकार घेताच तो खोलीतून बाहेर पडून घराबाहेर झोपत असे. हा प्रकार दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू होता.

उलट सासरकडूनच धमक्या

पतीच्या या विचित्र वर्तणुकीबाबत तिने सासरच्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र मदतीऐवजी “हे बाहेर कुणाला सांगू नको” अशी तिला उलट धमकी देण्यात आली. पुन्हा तिने तक्रार केल्यावर तिच्यावर मानसिक छळ वाढविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली असता “लग्न झालंय, निभावून न्यायचं” अशी सक्ती करण्यात आली.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

चटके देत अमानुष मारहाण

एका दिवशी पतीने “चल तुला दाखवतो” असे म्हणत तिला बेडरूममध्ये नेले आणि संतापाच्या भरात तिच्या प्रायव्हेट पार्टवर तसेच मांडीवर पेटत्या सिगारेटने चटके दिले. या अमानुष कृत्यानंतरही सासरकडील छळ थांबला नाही. नणंदांनी माहेरी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पत्नी जिमला जावी म्हणून तिच्याकडून 60 हजार रुपये आणून घेतल्याचा आरोपही तिने केला आहे.

अत्याचाराची परिसीमा आणि तक्रार

पतीने पुढे चुलत सासऱ्यांना तिच्याकडे पाठविल्याचे, त्यांनीही तिच्याकडे वाईट नजरेने पाहिल्याने तिने त्यांना घरात प्रवेश नाकारला. यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि शिवीगाळ तसेच मारहाण झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या तणावाला कंटाळून तिने आत्महत्येची धमकी दिल्यानंतर दोन्ही कुटुंबांत बैठक झाली. त्यामध्ये पतीने अखेर स्वतःच “मी शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही” अशी कबुली दिली.

अधिक वाचा  पुण्यात भाजपा मित्र पक्षाला मोठा धक्का; भाजपलाही धक्कादायक प्रवेशामुळे ही नवी भिती! एकावेळी २०० कार्यकर्त्यांचा सामूहिक राजीनामा

सध्या पीडिता माहेरी राहते आहे. पतीने जाणूनबुजून विवाह करून तिला मानसिक-शारीरिक त्रास दिला, तसेच सिगारेटचे चटके देत अत्याचार केला, अशा आशयाची तक्रार तिने येरवडा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या गंभीर प्रकारामध्ये तिचा पती, सासू, नणंद, चुलत नणंद आणि चुलत सासरे अशा एकूण पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सुरू आहे.