फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ़क्टर आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. महिला डॉक्टर आणि आरोपी प्रशांत बनकर यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यांच्यात ब्रेकअप झाला होता. पण बनकर आजारी पडल्यानं त्यांच्यात पुन्हा जवळीक निर्माण झाली. दरम्यान, बनकरने लग्नाला नकार दिल्यानं तिनं आत्महत्या करण्याची धमकी दिली होती अशी माहिती पोलीस तपासात समोर आलीय.






याबाबत मिळालेली माहिती अशी की, महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाळ बदने या दोघांना अटक करण्यात आलीय. त्यांच्या चौकशीतून अनेक खुलासे झाले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांचे प्रेमसंबंध होते. त्यांच्यात वादानंतर प्रशांत तिला टाळत होता. दोघांमध्ये अनेक कॉल झाल्याचं आढळून आलंय. तसंच व्हॉटसअप चॅटही पोलिसांच्या हाती लागलं आहे.
प्रशांत बनकर याच्यासोबत महिला डॉक्टरचं ब्रेकअप झालं होतं. दरम्यान, गेल्या महिन्यात प्रशांतला डेंग्युची लागण झाली. यामुळे दोघांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण झाली होती. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये फोटो काढण्यावरून वाद झाला होता. त्यानतंर आत्महत्या करेन असे मेसेजही महिला डॉक्टरने प्रशांत बनकर याला केले होते.
प्रशांत बनकर हा इंजिनिअर आहे. महिला डॉक्टर ज्या घरात रहायची त्या घरमालकाचा तो मुलगा आहे. पुण्यात विप्रो कंपनीत प्रशांत बनकर कार्यरत आहे. त्याचे पीडितेसोबत संबंध होते अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. तर दोघांमध्ये आत्महत्येच्या रात्रीही चॅटिंग झाल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय.
पीएसआय बदने याच्यासोबत मात्र गेल्या सहा महिन्यांपासून कोणता संपर्क नसल्याचं समोर आलंय. दरम्यान पीएसआय बदनेचे इतर कारनामे आता समोर येत आहेत. याआधी त्याच्यावर जातीवाचक शिवीगाळ करत विनयभंगाची तक्रार झाली होती. त्याची चौकशी केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फाईल बंद केली होती. मूळचा परळीचा असलेल्या बदने २०१३ मध्ये पोलीस शिपाई म्हणून रुजू झाला होता. त्यानं खात्याअंतर्गत परीक्षा दिली आणि तो २०२२-२३ मध्ये पीएसआय झाला अशी माहिती समोर येतेय.













