राज्यात नवीन जिल्हे तयार केले जाणार आहेत, अशा आशयाची एक पोस्ट काही दिवसांपासून समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. आता याचसंदर्भात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे.महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूरमध्ये शनिवारी (ता.20) महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. त्यांनी राज्य सरकारकडे तब्बल 81 नवे तालुके आणि 20 नवे जिल्हे तयार करण्यासंदर्भातला प्रस्ताव आल्याचं म्हटलं आहे. या त्यांच्या विधानानंतर आता पुन्हा एकदा राज्यात नवे तालुके आणि जिल्हे तयार होणार असल्याच्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे.






मात्र, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारसमोर जरी हा प्रस्ताव आला असला तरी आहे, त्यावर तत्काळ निर्णय घेतला जाणार नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे. ते म्हणाले, राज्याची भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन आणि जोपर्यंत 2021 ची जनगणना पूर्ण होत नाही आणि त्याचा तपशील समोर येत नाही, तोपर्यंत नवे तालुके आणि नवे जिल्ह्यांसंदर्भात कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याची भूमिका बावनकुळे यांनी स्पष्ट केली आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनगणनेचा अहवाल आल्यानंतर नवे तालुके आणि जिल्ह्यांबाबत निर्णय होईल असे संकेतही दिले आहेत. दरम्यान, नवीन जिल्हे होण्याची चर्चा दोन वर्षांपासून सुरू आहे. पण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यावेळी विधानसभेत या चर्चांना पू्र्णविराम दिला होता. 2023 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री होते. त्यांनी विधानसभेत बोलताना त्यांनी नवीन जिल्हे होण्याच्या चर्चांना ब्रेक लावला होता.
महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही, त्यामुळे तालुक्यांची संख्या जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे. तसेच प्रशासकीय विभाग हे जिल्हे कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांमध्ये विभागले आहेत.
ग्रामीण भागात 33 जिल्हा परिषदा, 351 पंचायत समित्या आणि 27,906 ग्रामपंचायती आहेत. नवीन तालुके आणि जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासनात सुलभता येऊन स्थानिक विकासाला गती मिळण्यास मोठी मदत होते. मात्र,याचवेळी राज्याच्या तिजोरीवर या प्रक्रियेसाठी मोठा आर्थिक भार आणि प्रशासकीय अडचणी येत असतात.













