राज्यभर परतीचा पाऊस आक्रमकच; पुढील २४ तास धोका ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे काही जिल्ह्यांना यलो अलर्ट

0

राज्यात परतीचा मान्सून सुरू झाला असला तरी पावसाची तीव्रता अजूनही कमी झालेली नाही. हवामान विभागाने आज (१७ सप्टेंबर) रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा दिला असून, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ मुसळधार पावसाची शक्यता

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

मराठवाड्यात पुन्हा काळे ढग

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांत आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होणार आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

  • सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद तसेच भाजीपाल्यांवर रोग व कीड प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांची काळजी घ्यावी.
  • पिकांमध्ये साचलेले पाणी त्वरित काढून टाका.
  • रोगट पाने किंवा फांद्या काढून टाकून शेत स्वच्छ ठेवा.
  • सोयाबीन आणि कापसामध्ये पानावरील रोगांची नियमित तपासणी करा.
  • कीड व रोग नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन फवारणी करा.
अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

नागरिकांसाठी सूचना

  • रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी.
  • विजांचा कडकडाट सुरू झाल्यास उघड्या जागेत जाणे टाळावे, घरात सुरक्षित राहावे.
  • वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे प्रवास शक्यतो टाळावा किंवा नियोजनबद्ध करा.

परतीचा पाऊस सुरू असूनही राज्यात पावसाचा जोर कायम आहे. पुढील २४ तास पिके आणि नागरिक दोघांसाठी महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, तर नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितता सुनिश्चित करावी.