बंडूआण्णाने आधीच आखला एक्झिट प्लॅन? नातवाचा गेम, पण कुटुंब ठेवलं सेफ, पाहा अटक आरोपींची यादी

0

आयुष कोमकर हत्या प्रकरणात सोमवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी समृद्धी महामार्गावर पाठलाग करून आंदेकर टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांनी रात्री उशिरा बुलढाणा पोलिसांच्या मदतीने आंदेकर टोळीतील सहा जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याचाही समावेश आहे.

बंडू आंदेकरला पोलिसांनी अटक केली असली तरी त्याने आयुष कोमकरची हत्या घडवून आणण्यापूर्वीच स्वत:सह आपल्या कुटुंबीयांचा एक्झिट प्लॅन रेडी केला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. गेल्या वर्षी बंडू आंदेकरचा मुलगा आणि नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या झाली होती. आपण कोणतंही बेकायदेशीर कृत्य करणार नाही. बदला घेणार नाही, असं बंडू आंदेकरने सांगितलं होतं.

अधिक वाचा  हैदराबाद गॅझेट जीआरला तात्काळ ‘स्थगिती’स सुप्रीमचा नकार; आता मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार

बदला घेतला पण कुटुंबाला सेफ केलं?

मात्र वनराज आंदेकर यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होताच आंदेकर टोळीने वनराजच्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरच्या १९ वर्षांच्या मुलाची हत्या घडवून आणली. त्याच्यावर १२ गोळ्या झाडल्या. आजोबानेच शरीराची चाळण करून नातवाचा जीव घेतला. पण ही हत्या घडवून आणताना बंडू आंदेकरने स्वत:सह आपल्या कुटुंबाला सेफ ठेवलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. कारण प्रत्यक्षात हल्ला करणाऱ्यांमध्ये एकही जण आंदेकर कुटुंबाच्या रक्तातील नात्याचा नाहीये.

आयुषवर प्रत्यक्षात गोळीबार करणाऱ्यांमध्ये यश पाटील आणि अमन पठाणचा समावेश आहे. तर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी अमित पाटोळे आणि सूजल मेरगू यांनी दोघांना कव्हर दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आयुषचा गेम करताना बंडू आंदेकरने प्रत्यक्षात आपल्या कुटुंबाचा हत्या प्रकरणाशी थेट संबंध येणार नाही, याची काळजी घेतली होती. काही तरुणांना सुपारी देऊन किंवा हाताशी धरून आंदेकरने हा बदला पूर्ण केल्याचं सांगितलं जात आहे. आता बंडू आंदेकरला अटक झाली असली तरी पुराव्याअभावी त्याच्यावर सौम्य कारवाई होऊ शकते, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक वाचा  दिवाळीचा पुणे मेट्रोला ‘झटका’! आर्थिक गणित बिघडले प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर

मात्र पोलीस आता आंदेकर टोळीविरोधात पुरावे गोळा करण्याचं काम करत आहेत. या प्रकरणात १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील ८ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर पाच आरोपींचा शोध सुरू आहे.

आयुष आंदेकर खून प्रकरणी अटकेतील आरोपींची यादी- 

  1. यश पाटील
  2.  अमित पाटोळे
  3.  अमन पठाण
  4.  सुजल मेरगु
  5.  बंडू आंदेकर
  6. स्वराज वाडेकर
  7. तुषार वाडेकर
  8.  वृंदावनी वाडेकर