पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

0
95

देशभरात यंदा गणपती मिरवणूकांचा जल्लोष पहायला मिळणार असून 6 सप्टेंबर रोजी शनिवारी गावोगावी आणि घरोघरी बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला जाईल. पुण्याच्या पारंपरिक गणपती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मानाच्या पाच गणपती बाप्पासह इतर गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात विसर्जनादिवशी होणाऱ्या गर्दीच्या पाश्वभूमीवर यंदा विसर्जनाच्या वेळा प्रशासनानं ठरवून दिल्या आहेत. पुण्यातील गणेशोत्सवाचा उत्कर्षबिंदू असलेली विसर्जन मिरवणूक यंदा ठरावीक वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांना नियमावली कळवण्यात आली असून यंदा शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने मिरवणूक पार पडावी यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीसंदर्भात यंदाचे वेळापत्रक आणि मार्ग जाहीर करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याची माहिती देत मिरवणूक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि वेळेत पार पडावी यासाठी नियमावली लागू केली असल्याचे सांगितले. शहरातील नागरिक आणि गणेश मंडळांना या नियमानुसारच सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

मानाचे गणपती मिरवणुकीत

पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती सकाळी 9:15 वाजता मंडईतील टिळक पुतळा येथे पोहोचेल. त्यानंतर सकाळी 9:30 वाजता मिरवणुकीची सुरुवात होईल. कसबा गणपती सकाळी 9:30 वाजता बेलबाग चौकात दाखल होऊन 10:15 वाजता लक्ष्मी रोडकडे मार्गस्थ होईल. दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती सकाळी 10:30 वाजता बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडकडे जाईल. सहावा मानाचा महापालिका गणपती आणि सातवा त्वेष्ट कासार गणपती दुपारी 1:00 वाजता मिरवणुकीत सामील होतील.

पुढील मंडळांची वेळ

लक्ष्मी रोड आणि शिवाजी रोडवरील मंडळे दुपारी 3:45 वाजता मुख्य मिरवणुकीत सामील होतील. श्रीमंत दगडूशेठ गणपती दुपारी 4:00 वाजता, तर जिलब्य मारुती आणि अखिल मंडई गणपती मंडळ संध्याकाळी 5:30 नंतर मिरवणुकीत सहभागी होतील. प्रशासनाच्या नियोजनानुसार संध्याकाळी 7:00 वाजेपर्यंत बेलबाग चौक रिकामा करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

मिरवणुकीचे मार्गदर्शक नियम

मंडळांना ठरवून दिलेल्या मार्गानेच विसर्जन मिरवणुकीत सामील होता येणार आहे. लक्ष्मी रोडवरील मंडळे फक्त बेलबाग चौकातून प्रवेश करतील. कसबा गणपती जाईपर्यंत अलका टॉकीज चौकाजवळ इतर मंडळांना थांबावे लागेल. मिरवणुकीदरम्यान मंडळांमध्ये अंतर राखणे बंधनकारक असून रेषा तोडण्यास परवानगी नाही.

ढोल-ताशा आणि डीजेवरील अटी

टिळक पुतळा ते बेलबाग चौक या दरम्यान ढोल-ताशा वाद्य वाजवण्यास बंदी आहे. फक्त बेलबाग चौकानंतरच त्यांना परवानगी दिली जाईल. प्रत्येक मंडळाला डीजे किंवा ढोल-ताशा पथक यापैकी एकच ठेवता येईल. जास्तीत जास्त 2 ढोल-ताशा गटांना परवानगी असून प्रत्येकीत 60 सदस्य असतील. तसेच ढोल-ताशा गटांनी विसर्जनानंतर अलका टॉकीज चौकात परतीच्या मार्गाने जाऊ नये, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

बेलबाग चौकात परिशिष्ट 1, 2 आणि 3 मधील मंडळांना प्राधान्य दिले जाईल. इतर मंडळांना ‘पहिले येणाऱ्यास प्रथम संधी’ या तत्त्वावर संधी दिली जाईल. टिळक रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोडवरील मिरवणुका सकाळी 10:30 पूर्वी सुरू होऊ नयेत, असा आदेशही देण्यात आला आहे.